Join us

आरटीई प्रवेशासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:06 AM

ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे शिक्षण संचालकांचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येत ...

ओटीपी समस्या, लॉकडाऊनमुळे शिक्षण संचालकांचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असलेले लॉकडाऊन आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये ओटीपीच्या निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी पालकांना ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे २०२१-२२ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवण्यात येत आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०२०-२१ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी सर्व जिल्ह्यांतील आरटीईअंतर्गत पात्र असलेल्या ९४३२ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्यास ३ मार्चपासून सुरुवात झाली. पालकांना २१ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत दिली होती; परंतु ११ ते १५ मार्चदरम्यान ओटीपीची तांत्रिक अडचण आल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नाहीत. ओटीपीची तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असली तरी अनेक पालकांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी संचालनालयाकडे केली होती. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे २०२१-२२ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज करण्यासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे शिक्षण संचालनालयाचे प्राथमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले.

मुंबई जिल्ह्यात गेल्यावर्षी ३६७ शाळांनी नोंदणी केली होती. त्यातून ७ हजार २ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र शाळांच्या नोंदणीत घट झाली असून केवळ ३५२ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी केवळ ६४६३ जागा उपलब्ध होऊ शकणार आहेत.

.....

आरटीई २०२१-२२ - शाळांची संख्या - पहिलीसाठी जागा - पूर्व प्राथमिक जागा

राज्य मंडळ - २९०-४८०९- ४१८

इतर बोर्ड - ६२- ११७२- ६४

एकूण - ३५२- ५९८१- ४८२