मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल सप्टेंबर महिना उजाडूनही लागलेले नाहीत. तसेच लागलेल्या निकालांमध्येही चुका आहेत. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अडचणी दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुन्हा एकदा प्रवेशाची मुदत वाढवली आहे. आता विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार असल्याचे मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.मुंबई विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचे मूल्यांकन मुंबई विद्यापीठात आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. आॅनलाइन पद्धतीमुळे येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबर महिना उजाडूनही विद्यापीठाने अद्याप सात निकाल जाहीर केलेले नाहीत. तसेच ४७० निकालांमध्येही अनेक त्रुटी असल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. मुंबई विद्यापीठाकडून अनेकांना अजूनही गुणपत्रिका हातात मिळालेल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे कठीण झाले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाने २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.मुंबई विद्यापीठाला संलग्न महाविद्यालयाने पत्र पाठविले आहे. बीए, बी.कॉम, बीएससी आणि एलएलबीच्या निकालांमध्ये काही गोंधळ झाले आहेत. काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत, पण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केले आहेत. त्याची प्रिंट आऊट अथवा पदवी प्रमाणपत्राच्या गॅझेट कॉपीच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे निर्देश महाविद्यालयांना विद्यापीठातर्फे देण्यात आले आहेत. सर्व शाखांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मुदतवाढ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण विद्यार्थ्यांची निकालाची चिंता अजूनही कमी झालेली नाही.
मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 2:54 AM