Join us

ट्राय नियमावलीच्या अंमलबजावणीस आता ३१ मार्चपर्यंत मिळाली मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:58 AM

केबल ग्राहक व चालकांमध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या गोंधळाची दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) त्यांच्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुंबई : केबल ग्राहक व चालकांमध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या गोंधळाची दखल घेत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) त्यांच्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आवडीच्या वाहिन्या कळविण्यामध्ये अनेक अडचणींना ग्राहकांना सामोरे जावे लागत होते.

ट्रायच्या नियमावलीच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे येत असल्याने ग्राहक तसेच केबलचालकांत संभ्रम होता. अनेक ठिकाणी ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी दिली नसल्याने सशुल्क वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद झाले होते. काही ठिकाणी दिलेल्या वाहिन्यांची यादी व प्रत्यक्षात दिसणाऱ्या वाहिन्यांमध्ये फरक होता तर मुंबईतील हॅथवेच्या ग्राहकांच्या टीव्हीवर सर्वच वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद झाल्याने मंगळवारपासून ब्लॅकआउट सदृश्य परिस्थिती उद्भवली होती. या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केबल आॅपरेटर अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युटर असोसिएशनने (कोडा) केली होती. ‘कोडा’चे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी याबाबत दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न केले होते, अशी माहिती ‘कोडा’चे पदाधिकारी राजू पाटील यांनी दिली.

ग्राहकांनी ३१ मार्चपूर्वी त्यांच्या आवडीच्या वाहिन्यांबाबत अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन ट्रायने केले आहे. मात्र ग्राहकांनी असा अर्ज भरून देईपर्यंत त्यांच्या विद्यमान पॅकेजला धक्का लावू नये, असे स्पष्ट निर्देश ट्रायने दिले आहेत.

बेस्ट फिट प्लॅन राबविण्याचे निर्देश म्हणजे ट्रायची माघार असून ग्राहकांची वाहिन्यांची निवड ठरविण्याचे अधिकार ग्राहकांऐवजी डीपीओंना दिल्याचा आरोप ‘कोडा’चे राजू पाटील यांनी केला आहे. परब यांच्यावर केबलचालकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे परब यांचे शब्द खरे ठरले व ट्रायला माघार घ्यावी लागल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, १ ते १० फेब्रुवारीपर्यंत केबलचे पॅकेज समाप्त होत असलेल्या व आवडीच्या वाहिन्यांची यादी दिली नसलेल्या हॅथवेच्या ग्राहकांचे प्रक्षेपण बंद करण्यात आल्याने मुंबईतील सुमारे १० हजारांपेक्षा अधिक ग्राहकांच्या टीव्हीवर ब्लॅकआउट झाले होते. हॅथवेचे डिस्ट्रिब्युटर अरुण सिंग म्हणाले, आम्ही याबाबत हॅथवेकडे अशा ग्राहकांना नि:शुल्क वाहिन्या दाखविण्यासाठी मागणी केली आहे. तर, ज्यांचे पॅकेज संपले होते त्यांनी बेसिक पॅकेज घेणे गरजेचे होते; मात्र त्यांनी त्याचे शुल्क भरले नसल्याने प्रक्षेपण बंद केल्याचे हॅथवेकडून सांगण्यात आले. प्रक्षेपण बंद केल्यानंतर काही ग्राहक पैसे भरून वाहिन्या सुरू करण्यासाठी गेले; मात्र सिस्टिमवर ताण आल्याने पैसे त्वरित भरता आले नाहीत व वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरू झाले नाही त्यामुळे ग्राहकांनी व केबलचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे....त्यानंतर ७२ तासांत प्रक्षेपण सुरू करण्याचे निर्देश

देशात १० कोटी केबल व ६.७ कोटी डीटीएच ग्राहक आहेत. त्यापैकी सुमारे ३५ टक्के ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची यादी दिली आहे. जे आवडीच्या वाहिन्यांची यादी देणार नाहीत त्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या वाहिन्यांच्या आवडीनुसार डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ओनर्सने (डीपीओ) ‘बेस्ट फिट प्लॅन’ तयार करून त्याप्रमाणे वाहिन्या दाखवाव्या लागतील. ग्राहकांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या आवडीच्या वाहिन्यांची यादी द्यावी, ग्राहकांनी यादी दिल्यानंतर ७२ तासांमध्ये त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांचे प्रक्षेपण सुरू करावे, असे निर्देश ट्रायने दिले आहेत.

टॅग्स :ट्राय