मुंबई : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. माता बालमृत्यू रोखणे, राज्याला कुपोषणमुक्त करणे यासह मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी या पुढील काळातही राज्यात व्यापक प्रयत्न करण्यात येतील, असे महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ यांच्या संघटनेच्या वतीने शनिवारी परळ येथे आयोजित फेम-२०१७ परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी अभिनेत्री पूनम ढिल्लो, शिल्पा शेट्टी, डॉ. रश्मी पै आदी मान्यवर उपस्थित होते.मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, गरोदर महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता शासन विविध योजना राबवित असून, बालकांना सकस आहार देण्यात येतो. राज्यात माता बालमृत्यूचे, तसेच कुपोषणाचे प्रमाण पूर्णत: थांबविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्र क्षेत्रात काम करणाºया विविध संस्था चांगले काम करीत असून, महाराष्ट्राला माता बालमृत्यूमुक्त, तसेच कुपोषणमुक्त करण्यासाठी या संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी ‘मान्यता’ या आरोग्यविषयक लोगोचे, तसेच आरोग्यविषयक माहिती देणाºया पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
माता बालमृत्यू रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न, बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:45 PM