विसर्जनात खड्ड्यांचे विघ्न, खड्डे बुजविण्यासाठी परदेशी तंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 05:52 AM2017-08-31T05:52:14+5:302017-08-31T05:52:22+5:30
यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा दिला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकणारा नाही. मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांचे तोंड फोडले आहे.
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा दिला होता. मात्र, हा आनंद फार काळ टिकणारा नाही. मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांचे तोंड फोडले आहे. अनेक ठिकाणी मुख्य रस्तेच खड्ड्यांत गेल्याने, वाहतूककोंडी होऊ लागली आहे, तसेच गणेशमूर्तींच्या विसर्जन मार्गातही खड्ड्यांचे विघ्न उभे राहिले आहे.
महापालिकेने या वर्षी सुमारे आठशे रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. प्रत्येक विभागात तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार, रस्त्यांचे प्राधान्य क्रम ठरविण्यात आले. यामध्ये पावसाळ्यात खड्डे पडण्याची दाट शक्यता असलेल्या, ११० रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी त्यांचे प्राधान्य क्रम एक ठरविण्यात आला. तर पावसाळ्यात काही दिवस तग धरू शकणाºया २४८ रस्त्यांचे प्राधान्य क्रम २ ठरविण्यात आले. महापालिकेच्या कारभाराची पोलखोल करणारे ‘वॉइस आॅफ सिटिजन’ हे संकेतस्थळ बंद करण्यात आले. मात्र, नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणारी एकही यंत्रणा नसल्याने, पालिकेने व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर तक्रार घेण्यास सुरुवात केली, तसेच प्रत्येक विभागातील रस्ते अभियंताला विशेष मोबाइल क्रमांक देऊन तक्रार घेण्यास सांगण्यात आले आहे.
खड्डे बुजविण्यासाठी परदेशी तंत्र
या वर्षी खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने आणखी एक परदेशी तंत्र आणले आहे. इस्रायल आणि आॅस्ट्रेलियातील हे तंत्र मुसळधार पाऊस व प्रचंड वाहतुकीतही टिकून राहील, असा दावा पालिकेने केला होता.
विसर्जनापूर्वी
खड्डे बुजविणार
५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे सार्वजिनक गणेशोत्सव मंडळे हवालदिल झाली आहेत. मात्र, पावसाने विश्रांती घेताच, तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू करण्यात येईल. गणेशमूर्ती विसर्जन मार्ग प्रामुख्याने खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी हमी आयुक्त अजय मेहता यांनी दिली आहे.