अटींमधून परदेशी दौरे वगळणार
By Admin | Published: March 17, 2017 04:59 AM2017-03-17T04:59:05+5:302017-03-17T04:59:05+5:30
महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या निविदांमध्ये अनेकदा परदेशातील संस्थादेखील सहभागी होत असतात.
मुंबई : महापालिकेच्या विविध प्रकल्पांच्या निविदांमध्ये अनेकदा परदेशातील संस्थादेखील सहभागी होत असतात. परदेशातील या संस्थांच्या प्रकल्पाची अथवा मालाची तपासणी करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना परदेशात पाठविण्यासंबंधीच्या अटींचा उल्लेख सरसकट सर्व निविदा प्रपत्रामध्ये यापूर्वी करण्यात येत होता. मात्र आता याबाबत आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार सुधारित आदेश नुकतेच लागू करण्यात आले आहेत. या सुधारित परिपत्रकानुसार निविदांच्या अटींमधून परदेश दौऱ्यांना वगळण्यात येणार आहे. तर येथून पुढे अत्यावश्यक असेल तेव्हाच संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या मंजुरीने तपासणीच्या अटीचा समावेश निविदा प्रपत्रामध्ये करता येणार आहे.
महापालिकेच्या अनेक मोठ्या प्रकल्प कामांच्या निविदा प्रक्रियांमध्ये परदेशातील संस्था सहभागी होत असतात. या अनुषंगाने परदेशातील कंत्राटदारांच्या ‘प्लान्ट’, मशिनरीची वा संबंधित उत्पादन प्रत्यक्षात पाठविण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना परदेशात जावे लागू शकते. त्यामुळे यापूर्वीच्या बहुतांश मोठ्या निविदेच्या अटी व शर्तींमध्येच परदेश दौऱ्यासंबंधीच्या अटी व शर्तींचा समावेश होता. मात्र आता सुधारित परिपत्रकानुसार यासंबंधीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार निविदाविषयक अटी व शर्तींमध्ये परदेश दौऱ्याच्या अटीचा समावेश न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तथापि, काही विशिष्ट स्वरूपाच्या कामांबाबत परदेश दौऱ्याची बाब अतिशय आवश्यक असेल तर संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या पूर्व-परवानगीनेच सदर उल्लेख निविदा प्रपत्रातील अटी व शर्तींमध्ये करता येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या परदेशी अभ्यास दौऱ्यावर सातत्याने टीका होत असते. राजकीय दौरे असोत वा प्रशासकीय दौरे. अशा दौऱ्यांतून काहीच निष्पन्न होत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार करण्यात आली आहे.
हे दौरे म्हणजे अनावश्यक खर्च असून, यातून हाती काहीच लागत नाही, अशी तोफही डागण्यात येते. प्रकल्प अभ्यास दौरे असोत वा अन्य काही; आयुक्तांच्या सुधारित आदेशानंतर यातून काय फलित निघते? याकडेही सर्वांचेच लक्ष असणार आहे.