अक्षय चोरगे / मुंबईपाचशे आणि हजाराची नोट व्यवहारातून बाद झाल्याचा फटका केवळ मनुष्यप्राण्यालाच बसलेला नाही तर तो मुक्या जनावरांनाही बसला आहे. नोटांच्या तुटवड्याचा गोशाळा आणि तबेल्यांना फटका बसला असून, नोटांअभावी चारा खरेदी करता येत नसल्याने आता जनावरांच्या पोटाला चिमटा बसू लागला आहे.मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर येथील बालाजी मंदिर ट्रस्टच्या गोशाळेतील गोरक्षकांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांवर व्यापारी वर्गाकडून चारा मिळेनासा झाला आहे. व्यापारी वर्गाकडून चारा खरेदीसाठी सुट्या पैशांची मागणी केली जात आहे. शिवाय सुटे पैसे नसतील तर नव्या नोटांची मागणी केली जात असून, आर्थिक फटक्यामुळे यापैकी काहीच करणे शक्य होत नाही. परिणामी सध्या जुन्या चाऱ्यासह शिल्लक आणि खाद्यपदार्थाच्या साठ्यावर जनावरांची भूक भागवावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही अडचण असतानाच कोणीही उधारीवर व्यवहार करण्यास तयार नाही आणि बँकेतून पर्यायाने एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा असल्याने समस्या सुटण्याऐवजी आणखीच वाढत आहे.दुसरे असे की, पाचशे आणि हजारच्या नोटा व्यवहारातून बाद होण्यापूर्वी नागरिकांकडून जनावरांसाठी चारा, अन्न, फळे अशी मदत होत होती. मात्र जेव्हापासून व्यवहार थंडावले आहेत; तेव्हापासून ही मदतही बंद झाली आहे. तबेल्यांची अवस्थाही अशीच काहीशी झाली असून, मानखुर्द येथील तबेल्यात जनावरांच्या खाद्यासाठीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन दिवसांत दुधाच्या विक्रीतून प्राप्त पैशांवर तात्पुरती व्यवस्था होत असली तरी नोटांच्या तुटवड्यामुळे चारा मिळणे मुश्कील झाल्याने चिंता आणखीच वाढत असल्याचे तबेला मालकांनी सांगितले.
नोटांच्या तुटवड्याचा जनावरांच्या पोटाला चिमटा
By admin | Published: November 15, 2016 5:12 AM