मुंबई : कॅन्सरच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत एका परिचारिकेला मायलेकींनी १०.४५ लाख रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी पीडितेने वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. तृप्ती परमार (५९) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्या गिरगावच्या सर हरकिसनदास नरोत्तमदास रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. मात्र, ते रुग्णालय २०१२ मध्ये बंद झाल्याने त्या सध्या घरीच होत्या. त्या राहत असलेल्या इमारतीमध्ये फ्लोरा डिसूजा नावाच्या महिलेचा फ्लॅट आहे, जी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे. परमार यांच्या तक्रारीनुसार १२ जुलै २०२२ रोजी या महिलेची बहीण रिटा पॅरिस आणि तिची मुलगीनिकिता त्यांच्या घरी आले. त्यावेळी रिटाने त्यांना सांगितले की, मला कॅन्सर असून त्याच्या उपचारासाठी २.५० लाख रुपयांची गरज आहे, ज्यासाठी मला मदत करावी. मात्र, परमार यांनी पैसे द्यायला नकार दिला.
दिलेले सर्व चेक बाउन्स:
आरोपींनी फ्लोराशी फोनवर परमार यांचे बोलणे करून दिले. फ्लोराने सांगितले की, निकिता ही हवाई सुंदरी असून ती टप्प्याटप्प्याने तुझे पैसे परत करेल. तसेच रिटाला अडचणीमध्ये मदत केल्याने ती जास्तीचे पैसे परतफेड देईल. हे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी दोन लाख रुपये दिले. नंतर अजून तीन वेगवेगळ्या कारणांनी एकूण १० लाख ४५ हजार रुपये त्यांनी उकळले. मात्र, त्यांनी दिलेले चेक बाउन्स झाले.
वयोवृद्ध असल्याचा घेतला फायदा:
मायलेकींनी परमार वयोवृद्ध असल्याचा फायदा घेत त्यांची आर्थिक फसवणूक केल्यानंतर त्यांच्या विरोधात वाकोला पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या मायलेकींवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.