Join us  

इन्स्टावर महादेव की दिवानी नामे खाते बनवत पैसे उकळले! तरुणीच्या फोटोचा केला गैरवापर

By गौरी टेंबकर | Published: June 22, 2024 12:11 PM

अनोळखी भामट्यावर गुन्हा दाखल

मुंबई: अंधेरीतील २२ वर्षीय तरुणीचा फोटो  वापरत महादेव की दिवानी ( mahadev_ki_divani ..) असे अकाउंट इंस्टाग्रामवर बनवले. तसेच त्या मार्फत तिच्या मैत्रिणीकडून पैसे उकळत त्या खात्याला वेगवेगळी नावे देण्यात येत आहेत. हा प्रकार अंधेरी पोलिसांच्या हद्दीत घडला असुन याविरोधात तिने तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारदार निधी दुबे (२२) या अंधेरी परिसरात कुटुंबीयांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. दुबे यांच्या तक्रारीनुसार, त्यांची मैत्रीण काजल पटेल ही १० जुन रोजी त्यांना भेटली आणि तिने उसने दिलेले ४३० रुपये त्यांच्याकडे मागितले. त्यावर मी तुझ्याकडून कोणतेही पैसे घेतले नसल्याचे त्यानी पटेलला सांगितले. तेव्हा तुझा फोटो वापरून अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर तुझे बनावट खाते बनवले आहे असे पटेलने सांगत सदर अकाऊंट दुबेला दाखवले. दुबे यांनी ते खाते पाहिले असता त्यात त्यांचा फोटो वापरत त्या खात्याला महादेव की दिवानी असे नाव देण्यात आले होते. त्याचा वापर करत सदर खाते बनवणाऱ्या भामट्याने रागिनी दुबे नावाचा क्यू आर कोड पाठवत दोन वेळा पटेलकडून पैसे घेतल्याचे तिने दुबेला सांगितले.

मुख्य म्हणजे त्यानंतर हा आयडी mahadev_ki_divani1.., तसेच khushi_dubey_15_ असा बदलण्यात आला. तसेच सध्या Khushi_pandit_1215 असा बदलून सदर खात्याचा वापर केला जात असल्याचे दुबे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद आहे. परवानगी न घेता फोटोचा गैरवापर करत पैसे उकळणाऱ्या सदर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात दुबे यांनी अंधेरी पोलिसात धाव घेतल्यानंतर याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ४१९, ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.