लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांचा पीए आणि मंत्रालयीन सेक्रेटरी असल्याचे भासवून आणि त्यांच्या आवाजाची नक्कल करून सुरू असलेल्या खटल्यांची गोपनीय माहिती वकिलांकडून मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एवढेच नाही तर याच माहितीच्या आधारे पैसेदेखील उकळण्यात आले आहेत. शेलार यांचे खासगी स्वीय सहायक नवनाथ सातपुते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अॅड. विजेंद्र राय, अॅड. यास्मिन वानखेडे, अॅड. इरम सय्यद, अॅड. रईस खान आणि अॅड. आफरिन यांना जुलैपासून अनोळखी कॉल येत होते. कॉल करणारा शर्मा असे नाव सांगून मंत्रालयीन सेक्रेटरी असल्याचे भासवत होता. कारागृहांतील आरोपींची, त्यांच्यावरील प्रलंबित खटल्यांची, त्यांच्या नातलगांची माहिती आरोपीने वकिलांकडून घेतली. त्यासाठी शेलार यांचा हुबेहूब आवाज काढला.
मी आशिष शेलार...
आशिष शेलार बोलत असल्याचे समजून वकिलांनी आरोपीला माहिती दिली. त्यानंतर, त्याने आरोपींच्या नातेवाइकांना फोन करून शेलार यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. नंतर कैदी असलेला नातेवाईक जखमी झाल्याचे खोटे सांगून उपचारासाठी त्याच्या नातेवाइकांकडून आठ हजार रुपये उकळले.