मुंबई : मालाड परिसरातील बिल्डरला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावे फोन करीत २० लाख रुपयांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी त्यांनी दिंडोशी पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यावसायिकाला एका मोबाइलवरून २० जुलैला रात्री ९:३० च्या सुमारास फोन करीत २० लाख रुपयांची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. कॉलरने तो रवी बिश्नोई टोळीकडून बोलत असल्याचे व्यावसायिकाला सांगितले. बिश्नोई टोळीचे तीन हस्तक सध्या तुरुंगात आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी पैशांची गरज असल्याचेही तो म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार या प्रकरणी त्यांनी दिंडोशी पोलिसांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
या वृत्ताला दुजोरा देत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ १२ च्या पोलिस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली. आम्ही संबंधित क्रमांकाच्या मदतीने तांत्रिक तपास करीत असून, लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडूनही याप्रकरणी समांतर तपास सुरू केला आहे. ते कॉलरचा शोध घेत आहेत.