Join us  

फ्लॅट खरेदीच्या रक्कमेसाठी लुटीचा बनाव; ३२ वर्षीय तक्रारदार तरुणाला अटक

By मनीषा म्हात्रे | Published: September 06, 2023 11:38 PM

फ्लॅट खरेदीच्या रक्कमेसाठी तरुणाने ३५ लाखांच्या लुटीचा बनाव केल्याची माहिती माटुंगा पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे.

मुंबई : फ्लॅट खरेदीच्या रक्कमेसाठी तरुणाने ३५ लाखांच्या लुटीचा बनाव केल्याची माहिती माटुंगा पोलिसांच्या कारवाईत समोर आली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी ३२ वर्षीय तक्रारदार तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी अजित पटेल आणि करण सावंत यांच्यावर कारवाई केली आहे.

अंधेरी परिसरात पटेल राहण्यास आहे. पटेलने बुधवारी माटुंगा पोलीस ठाणे गाठून येथील एका पेट्रोल पंपाजवळून आपल्याकडील ३५ लाखांची रोख रक्कम दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चोरल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांर्भिय लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता पटेल सांगत असलेल्या माहितीप्रमाणे काहीच आढळले नाही. अखेर पोलिसांनी पटेलकडे कसून चाैकशी केली. तो प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती देत होता.

 पोलिसांनी पटेल आणि सावंतची उलटतपासणी सुरु केली. अखेर, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पटेल याला जूना फ्लॅट खरेदी करायचा होता. त्याची ३५ लाख रुपये रक्कम त्याला बुधवारी फ्लॅटधारकाला द्यायची होती. मात्र ही रक्कम ठरलेल्या वेळेत देणे शक्य होत नसल्याने त्याने चालक सावंत याच्या मदतीने हा खोटा लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली आहे. 

टॅग्स :धोकेबाजी