Join us

मोफत उपचाराच्या नावाखाली लुबाडणूक; ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 10:52 AM

जुलै २०१२ मध्ये काही जिल्ह्यापुरती सुरुवात केलेली योजना काही काळानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांत लागू केली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई  :  गेल्या ११ वर्षांपासून राज्यात महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू असून या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील गरिबांना मोफत उपचार दिले जातात. या योजनेचा आतापर्यंत लाखो रुग्णांना फायदा झाला आहे.  कारण या योजनेत ९९६ आजारांचा समावेश असून त्याकरिता दीड लाख रुपयांपर्यंत उपचार केले जातात. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा अडीच लाख इतकी आहे. सरकारची योजना चांगली असली तरी त्यामध्ये काही दुष्टप्रवृतींमुळे काही रुग्णांना या योजनेच्याखाली लुबाडण्यात आले आहे. योजनेचा लाभ देण्यासाठी पैसे घेतले असल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे काही रुग्णालयांवर प्रशासनाने कडक कारवाई करत त्यांना या योजनेतून काढून टाकले आहे. 

जुलै २०१२ मध्ये काही जिल्ह्यापुरती सुरुवात केलेली योजना काही काळानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांत लागू केली. या योजनेचा काही रुग्णालयांनी चांगला फायदा रुग्णांना करून दिला, तर काही रुग्णालयांनी रुग्णांची लुबाडणूक केली. ११ वर्षांत मुंबई आणि उपनगरांतून  ३० रुग्णालयांना या योजनेतून वगळण्यात आले. या रुग्णालयाच्या विरोधात  ठरलेल्या पॅकेजपेक्षा अधिक पैसे रुग्णांकडून घेणे, अतिरिक्त बिल दाखविणे, कोरोना काळात काही रुग्णांना या योजनेच्या नावाखाली उपचार नाकारणे. अशा तक्रारी आढळल्याने त्यांना या योजनेतून काढून टाकले, तर काही रुग्णालयांनी स्वतःहून या योजनेच्या बाहेर जाण्यासाठी परवानगी मागितली होती.

ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात सुरू आहे. एक हजारांपेक्षा अधिक रुग्णालयात ही योजना कार्यरत आहे. या योजनेचा आतापर्यंत लाखो रुग्णांनी फायदा घेतला आहे. पात्र रुग्णांना कोणतेही शुल्क न देता या योजनेतून मोफत उपचार मिळतात. ही योजना गरीब रुग्णांसाठी एक वरदान आहे. कुठल्याही रुग्णालयाच्या बाबतीत काही तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून त्यावर योग्य ती कारवाई केली जाते. - विनोद बोन्द्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त कार्यभार, महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना

सध्या मुंबईत ६० रुग्णालयांत योजना

 या योजनेत काही रुग्णालये नव्याने आली तर काही रुग्णालयांना काढून टाकले, तर काही रुग्णालये स्वतःहून योजनेचे दर परवडत नसल्यामुळे योजनेतून बाहेर पडले आहे. 

 सध्याच्या घडीला शहरात ६० रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू असून त्यामध्ये काही सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांचा समावेश आहे. त्यासोबत ३८ धर्मादाय आणि खासगी रुग्णालयात या योजेनचा लाभ रुग्णांना मिळत आहे. गेल्या ११ वर्षांत मुंबईत २ लाख ९० हजार ७९३ रुग्णांनी या योजनेचा फायदा घेतला.     

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल