मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:27 AM2024-05-15T05:27:41+5:302024-05-15T05:28:26+5:30
पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन पीयूष गोयल यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: काँग्रेस सरकारने कायम मध्यमवर्गीयांची पिळवणूक करण्याचे धोरण ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे निर्णय घेतले. पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे दोन्ही वर्गाला समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
बोरीवली (पश्चिम) येथे चंदावरकर रोडवर जैन मंदिर येथे काढण्यात आलेल्या नमो यात्रेदरम्यान पीयूष गोयल बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसच्या वळचणीला असलेले लोक वारसा कर लागू करण्याची इच्छा व्यक्त करत मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याच्या विचारात आहेत, तर मोदी सरकार दुर्बल आणि मध्यमवर्गाला कसे सक्षम करता येईल, या प्रयत्नात आहे.
यात्रेत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी, अॅड. इंद्रपाल सिंग सहभागी झाले होते, तर दहिसर येथील गावदेवी मंदिरात जाऊन गोयल यांनी देवीचे दर्शन घेतले. एक्सर ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.