मुंबई : व्यापाऱ्याकडून एक कोटींची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आणि अचानक पुन्हा कस्टमच्या सेवेत दाखल झालेला कस्टम अधीक्षक नीलकमल छोटालाल सिंग याला मंगळवारी रात्री उशिरा अखेर कस्टम विभागाने निलंबित केले. त्याच्याविरोधातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, याच कारणास्तव त्याला सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील एका व्यापाऱ्याने जीएसटी कर भरण्यामध्ये साडेतीन कोटी रुपयांचा कर बुडवला असून, ते प्रकरण मिटविण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगत या अधीक्षकाने संबंधित व्यापाऱ्याला धमकावले होते. नीलकमल सिंग याच्यासोबत या प्रकरणात कस्टम विभागाच्याच ललित बसारे या आणखी एका अधीक्षकाचे नाव पुढे येत आहे. या खंडणीची मागणी केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने या अधिकाऱ्याविरोधात सर्वप्रथम जीआरपी पोलिसांनी जूनमध्ये तक्रार दाखल केली होती. नंतर हे प्रकरण आग्रीपाडा पोलिसांत वर्ग करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी वारंवार याच्या चौकशीचा प्रयत्न करूनही त्याने सहकार्य केले नव्हते. तसेच या प्रकरणी पोलिसांनी कस्टम विभागाशीदेखील पत्रव्यवहार केला होता. मात्र पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नव्हते. हा अधीक्षक जवळपास गेल्या एक महिन्यापासून सुट्टीवर होता. त्यानंतर अचानक तो पुन्हा सेवेत दाखल झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.