ईडी, आयटीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ
By admin | Published: February 7, 2017 05:33 AM2017-02-07T05:33:07+5:302017-02-07T05:33:07+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व प्राप्तीकर विभागाला (आयटी) तपासाबाबत माहिती देण्यासाठी
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) व प्राप्तीकर विभागाला (आयटी) तपासाबाबत माहिती देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. २०१२ मध्येच ईडीने याप्रकरणी सिंह यांच्यावर एसीआर नोंदवला आहे. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांची मुदत मागितली.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने योग्यप्रकारे तपास केला नसल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका तुलसीदास नायर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.
गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईडीला प्रतिवादी करण्याचे निर्देश देण्याबाबत माहिती देण्याचे निर्देश ईडीला दिले होते. त्यानुसार सोमवारच्या सुनावणीत ईडीतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी खंडपीठापुढे उपस्थिती लावत सूचना घेण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागितली.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या हवाला घोटाळ्यात कृपाशंकर सिंह यांचाही हात असल्याने याप्रकरणी वादग्रस्त असलेली संपत्ती आणि याप्रकरणातील संपत्ती एकच आहे का? हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सूचना घ्याव्या लागतील. त्यामुळे उत्तर देण्यासाठी काही आठवड्यांची मुदत द्यावी, अशी विनंती वेणेगावकर यांनी खंडपीठाला केली. कृपाशंकर सिंह बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीने मार्च २०१२ मध्येच ईसीआर नोंदवला आहे. मात्र गेले चार वर्षे ईडीने तपास केला नाही. सोमवारच्या सुनावणीत प्राप्तीकर विभागाच्या वकिलांनीही तपशीलवार माहिती सादर करण्यासाठी
हायकोर्टकडून मुदत मागितली. पॅनकार्ड संदर्भातील सर्व माहिती गाझियाबाद येथे असल्याने तेथील ज्येष्ठ अधिकाऱ्याकडून यासंदर्भातील माहिती देण्याची विनंती केली आहे.
ही माहिती मिळण्यास काही
दिवस लागतील. त्यामुळे उत्तर देण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती प्राप्तीकर विभागाच्या वकिलांनी केली. (प्रतिनिधी)