मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर रेल्वे सेवा सुरळीत नसल्याने परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने या मार्गावर जादा बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्या व्यतिरिक्त ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.
कर्जत - लोणावळा दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर अनेक महत्त्वाचा रेल्वे गाड्या रेल्वेने पुढील काही दिवसांसाठी बंद केले आहेत. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवाकर रावते यांनी दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूने(मुंबई-पुणे) दररोज शिवनेरीच्या जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे.
तसेच, मागणीनुसार साध्या बसेस सुद्धा या मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.