Join us

कामगार कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार नियमबाह्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:11 PM

कामगार प्रधान सचिव राजेश कुमार यांचा अनागोंदी कारभार !

मुंबई : कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कामगार कल्याण मंडळात प्रधान कामगार सचिव राजेश कुमार यांनी गेल्या वर्षभरापासून अनागोंदी कारभार चालवला आहे. कामगार कल्याण मंडळाचा कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था म्हणून कामगार कल्याण मंडळामध्ये मुळ नियुक्ती नियमबाह्य असलेल्या आणि कामगार कल्याण मंडळाच्या आयुक्त पदाच्या नेमणुकीसाठी अपात्र असलेल्या सहाय्यक कामगार कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांच्याकडे गेल्या मार्च २०१९ पासून राजेश कुमार यांनी आजवर कायम ठेवला आहे. कामगार कल्याण अधिनियम १९५३ मधील तरतुदींनुसार कल्याण आयुक्त पदावरील नेमणुकीसाठी उपकल्याण आयुक्त पदावर काम करण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तायडे यांनी कामगार कल्याण मंडळाचा आयुक्त पदाचा अतिरिक्त कारभार स्वीकारल्यापासून त्यांच्याविरोधात तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार भ्रष्टाचार, अपसंपदा आणि गुंडगिरी यांसारख्या अनेक प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे!

महेंद्र तायडे यांचा कामगार कल्याण मंडळाचा आयुक्त पदाचा कार्यभार कायम ठेवल्याने मंडळामध्ये उदभवलेल्या भ्रष्टाचार आणि गैरकारभाराविरुद्ध शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.महेंद्र तायडे यांची मूळ नियुक्तीच ही नियमबाह्य असून त्यांना त्वरित सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,माजी महापौर सुनिल प्रभ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

याप्रकरणी कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणाची चौकशी करतो,आणि यामध्ये जर कोणी दोषी आढळल्यास तो अधिकारी किती मोठा का असेना त्यांच्यावर कारवाई तर होणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलतांना स्पष्ट केले.

आमदार सुनिल प्रभू यांनी नागपूर येथील विधीमंडळाच्या गेल्या डिसेंबर २०१९ येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना दाखल करीत तायडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.विधानसभेमध्ये स्वीकृत झालेल्या लक्षवेधी  सूचनेस आजपर्यंत कामगार सचिव राजेश कुमार यांनी उत्तर दिलेले नाही.  रफिक मुलाणी, सरचिटणीस, सिटिझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र

महेंद्र तायडे यांची कामगार कल्याण मंडळातील मूळ नियुक्ती कल्याण निधी निरीक्षक पदासाठी असताना बेकायदेशीरपणे त्यांना वरिष्ठ कल्याण निधी निरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली.तसेच निवडप्रक्रियेदरम्यान एकूण ५ पैकी ४ उमेदवार गैरहजर असताना एकट्या तायडे यांना बोलवून बेकायदेशीरपणे नियुक्ती देण्यात आली आणि निवडप्रक्रियेदरम्यान समाज कल्याण विभागाचे पॅनलदेखील उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारामध्ये प्राप्त कागदपत्रांतून दिसून येते.  

कामगार प्रधान सचिव राजेश कुमार यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्यामुळेच अनेक गंभीर तक्रारी प्राप्त होऊन देखील मंडळामध्ये मुळ नियुक्ती बोगस झालेल्या आणि कल्याण आयुक्त पदाच्या नियुक्तीसाठी अपात्र असणाऱ्या सहाय्यक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांचा कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार गेल्या वर्षभरापासून कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजेश कुमार यांची बदली करावी आणि त्यांच्या गैरकरभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी आपण आमदार सुनील प्रभू,कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील,कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे असे रफीक मुलाणी यांनी सांगितले.

याप्रकरणी कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्याशी आज सायंकाळी 6.05 मिनीटांनी संपर्क साधला असता मी मिटींग मध्ये आहे,एक तासांनी फोन करा असे सांगितले.नंतर पुन्हा आमच्या प्रतिनिधीने पुन्हा सायंकाळी 7.05 मिनीटांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुजोरा दिला नाही.त्यामुळे त्यांची भूमिका मात्र समजू शकली नाही.