फेरीवाल्यांना परवान्यासाठी १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 03:20 AM2018-09-30T03:20:00+5:302018-09-30T03:20:25+5:30
अधिवास दाखला देण्याची सूचना
मुंबई : अधिकृत परवान्यासाठी फेरीवाल्यांना १५ आॅक्टोबरपर्यंत अधिवासी दाखल सादर करण्याची मुदत महापालिकेने दिली आहे. ३० टक्के फेरीवाले विस्थापित झाले असल्याने ही मुदत वाढ देण्यात आली आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असल्याने सर्व कार्यवाही वेगाने सुरू आहेत.
केंद्र सरकारच्या फेरीवाला धोरणानुसार, महापालिकेने २०१४ मध्ये अर्ज मागवल्यानंतर ९९ हजार ४३५ जणांनी परवान्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने फेरीवाल्यांच्या परवान्यांचा प्रश्न गेली चार वर्षे रखडला आहे. त्यात गेल्या वर्षी एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेरीवाला क्षेत्र तयार करून, अधिकृत फेरीवाल्यांना परवाना देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यानुसार, महापालिकेने शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात फेरीवाल्यांसाठी ८५ हजार ८९१ जागा निश्चित केल्या आहेत. २०१४ च्या सर्वेक्षणानुसार जागा व अर्जांची तपासणी सुरू आहे.
गैरप्रकार टळता येतील
च्फेरीवाल्यांना परवाने देताना त्यात गैरप्रकार टाळण्यासाठी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व माहिती एकत्र करण्यात आली आहे.
च्पालिकेच्या फेरीवाला धोरणात मंदिर आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना परवाना देण्यात येणार नाही. या परिसरात फक्त पूजेचे साहित्य विकण्यासाठीचा परवाना देण्यात येईल.
च्अधिवास दाखला देणाऱ्या अर्जदारांना पालिकेकडून फेरीवाला परवाना देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून रजिस्टर पोस्टाने नोटीसही पाठविण्यात आली. ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांपैकी ३० टक्के फेरीवाले विस्थापित झाले आहेत. त्यामुळे अनेक पत्र परत आल्याने, अधिवास दाखला सादर करण्यासाठी १५ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.