मुंबई-पुणे मार्गावर १० ऑगस्टपर्यंत शिवनेरीच्या २४ जादा फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:01 AM2019-07-26T02:01:23+5:302019-07-26T06:14:04+5:30
रेल्वे बंद असल्याने उपाय; दररोज धावणार १८० जादा बस
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कर्जत ते लोणावळा घाट भागात पायाभूत सुविधांची उभारणी व दुरुस्तीसाठी मुंबई ते पुणे जाणाºया मेल, एक्स्प्रेस ९ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी धावून आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या २४ जादा फेºया धावणार असून मुंबई-पुणे मार्गावर रोज १८० जादा बस सोडण्याचे निर्देश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत.
मुंबई ते पुणे मार्गावरील मेल, एक्स्प्रेस रद्द केल्याने २५ जुलै ते १० आॅगस्ट या कालावधीपर्यंत जादा बस सोडाव्यात. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळता येईल, अशा सूचना रावते यांनी दिल्या आहेत. त्यानुसार एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे येथून नियमित बसेसव्यतिरिक्त दररोज १८० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. यासह मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा २४ फेºया सुरू केल्या आहेत.
दुरुस्तीच्या कारणास्तव मुंबई, कोल्हापूर, पुणे, मिरज, सांगली या मार्गावरील मेल, एक्स्प्रेस मुंबई ते पुणे दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना थेट एका एक्स्प्रेसमधून मुंबई गाठणे शक्य होणार नाही. त्यांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून ५०, ठाणे विभागातून ५०, पुणे विभागातून ७० आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून एकूण १० अशा १८० जादा बस दररोज सोडण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रवाशांच्या मागणीनुसार बस स्थानकावरून विशेष बस सोडण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.