विद्यापीठात अतिरिक्त काम करणार नाही! अस्थायी कामगार संघटनेची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 07:09 AM2018-04-16T07:09:47+5:302018-04-16T07:09:47+5:30
मुंबई विद्यापीठात उशिरा लागलेले निकाल, त्यातील घोळ, परीक्षेतील त्रुटी या साऱ्या प्रकारानंतर, आता अस्थायी कामगारांचा प्रश्न समोर आला आहे. ऐन परीक्षांच्या काळात अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने घेतला आहे.
मुंबई - मुंबई विद्यापीठात उशिरा लागलेले निकाल, त्यातील घोळ, परीक्षेतील त्रुटी या साऱ्या प्रकारानंतर, आता अस्थायी कामगारांचा प्रश्न समोर आला आहे. ऐन परीक्षांच्या काळात अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने घेतला आहे. या कर्मचाºयांना मिळणाºया तुटपुंज्या वेतनात घर कसे चालवायचे, असा प्रश्न पडला आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या अनास्थेमुळेच ही स्थिती ओढावल्याचा आरोप मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने केला आहे. कामगार संघटनेच्या या निर्णयामुळे आता मुंबई विद्यापीठ प्रशासनापुढे नवीन प्रश्न उभा राहिला आहे.
मुंबई विद्यापीठात सध्या शेकडो कर्मचारी अस्थायी तत्त्वावर काम करतात. या अस्थायी कामगारांना किमान वेतन तर सोडाच, पण आवश्यक सुविधाही दिल्या जात नसल्याचा आरोप विद्यापीठ कामगार संघटनेने केला आहे. विद्यापीठात शिपाई कामगाराला तासाला १३ रुपये दिले जातात, तर कनिष्ठ लिपिक कामगाराला तासाला १८ रुपये दिले जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी दिली, तसेच विद्यापीठाने २००८ नंतर अस्थायी कामगारांचा अतिरिक्त भत्ता वाढविलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. अस्थायी कामगाराचा अपघाती विमाही काढलेला नसल्याचे त्यांनी नमूद केले.
अस्थायी कर्मचाºयांना सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप मिलिंद तुळसकर यांनी केला आहे. मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. जोपर्यंत त्यांच्या प्रश्नाबाबत अंतिम तोडगा निघत नाही, तोपर्यंत भूमिका कायम ठेवण्याची घोषणा मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.
कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही विद्यापीठाने निर्णय न घेतल्याने कर्मचाºयांनी हे पाऊल उचलले आहे.
- सुप्रिया कारंडे, सिनेट सदस्य.