वायुप्रदूषणात हरवत चाललेल्या मुंबापुरीवर ‘वृक्ष योजने’चा उतारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:08 AM2020-01-13T01:08:08+5:302020-01-13T01:08:58+5:30
मुंबईच्या विकास आराखड्यानंतर आता वृक्ष आराखडा
मुंबई : मुंबापुरीचा असा कोणताच कानाकोपरा नाही की तो प्रदूषित झालेला नाही. प्रत्येक ठिकाणी जल आणि वायुप्रदूषणाने कहर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे मान्सून ओसरल्यानंतर आणि हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईतल्या वायुप्रदूषणाने तर कहर केला आहे. परिणामी यावर उपाय आणि मुंबई अधिक हिरवीगार दिसावी, मुंबईत ठिकठिकाणी झाडे लागावीत म्हणून ‘वृक्ष योजने’साठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या हालचालींना वेग आला आणि त्या यशस्वी झाल्या तर निश्चितच भविष्यात का होईना मुंबईचे पर्यावरण सुदृढ राहण्यास हातभार लागणार आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहिले आहे. म्हात्रे यांचा मुंबईसाठी ‘वृक्ष योजना’ तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर १४ जानेवारी रोजी महासभेत चर्चा होईल. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त प्रवीण परदेशी यांना पाठविला जाईल. प्रस्तावानुसार महानगरपालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्याप्रमाणे वृक्ष योजना करावी. पर्यावरणाप्रमाणे विविध वनस्पती विकसित होण्यासाठी नागरिकांना सूचित करण्यासाठी वृक्ष योजना नक्कीच हातभार लावेल. विकास आराखड्याप्रमाणे कोणत्या क्षेत्रात कोणते झाड शोभेल, याचा विचार करण्यात यावा, असे अनेक मुद्दे लोकप्रतिनिधीने नमूद केले आहेत. रस्ते, समुद्रकिनारे, औद्योगिक क्षेत्रे आणि जवळपास असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या जवळपास वृक्ष लागवडीची योजना तयार केली जावी, यावर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे.
दरम्यान, अशा अनेक योजनांमुळे नागरिकांना आणि पर्यावरणवाद्यांना वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण अधिक चांगले करता येणार आहे. विशेषत: शहराचे हिरवेगार कवच कमी होत आहे. परिणामी भविष्यात पर्यावरणावर विविध संकटे येऊ नयेत म्हणून विविध संस्था कार्यरत असून, प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून तिवरांच्या जागा, समुद्रकिनारे, जंगले स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली गेली असून, यात लोकप्रतिनिधींसह तरुणवर्गही सहभागी होत आहे.
चार ते पाच माणसांमागे केवळ एकच वृक्ष
मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकार मुंबईतल्या पर्यावरणाच्या नावाने कितीही गोडवे गात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. येथील वृक्षांची संख्या दिवसागणिक घटत असून, मुंबईचा विचार करता येथे चार ते पाच माणसांमागे केवळ एकच वृक्ष असल्याची वस्तुस्थिती आहे.
जसा मुंबईचा विकास आराखडा आहे, तसा पुढील २० वर्षांचा विचार करता मुंबईसाठी वृक्ष आराखडा असणे गरजेचे आहे. दरवर्षी मुंबईत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येते. मात्र मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीची वृक्ष लागवड करताना माहिती नसल्याने काही वेळा झाडे अंगावर पडून माणसे मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी कोणती झाडे लावायची, रस्त्याच्या कडेला कोणती झाडे लावायची व अन्य ठिकाणी कोणती झाडे लावायची यासाठी वृक्ष आराखडा असणे गरजेचे आहे. वृक्ष आराखड्यामुळे मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीनुसार वृक्ष लागवड झाल्याने मुंबई आणखी सुंदर व हिरवीगार होईल. मुंबईला मोठ्या प्रमाणात प्राणवायूही मिळेल. - शीतल म्हात्रे, अध्यक्ष, विधी व न्याय समिती, मुंबई मनपा.
बकाल शहराच्या दिशेने मुंबईची वाटचाल सुरू आहे. येथील पाण्याचे साठे, जंगले, उद्याने, मोकळ्या जागा मुंबईकर आणि प्रशासनाने नष्ट केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत वसुंधरा आहे, असे म्हणण्यासारखे काहीच उरले नाही.
बोरीवली येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यान, आरे कॉलनी, मलबार हिल येथील हँगिंग गार्डन व प्रियदर्शनी पार्क आणि सायन येथील महाराष्टÑ नेचर पार्क, भायखळा येथील राणीची बाग येथे काही प्रमाणात हिरवळ टिकून आहे.
सिमेंटची जंगले उभारली गेली आहेत. कुठेही मोकळी जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे खेळती हवा न मिळाल्याने हवा कोंडली जाते. त्यामुळे एकाच ठिकाणी हवा थांबल्यामुळे गरम हवेचे चटके नागरिकांना बसत आहेत. वृक्षतोड केल्यामुळे झाडांची सावली नष्ट झाली आहे. वातावरणातील गारवा कायम राखण्याचे काम झाडे करत आहेत, परंतु त्यांनाही विकासकामांमुळे तोडण्यात येत आहे.
केवळ दोन वृक्ष लावून वसुंधरा वाचणार नाही. तर येथील विहिरी, तलाव, नदी-नाले, समुद्रकिनारे, कांदळवने, उद्याने, जंगल आणि प्राणी वाचवायला हवेत, असे शहर नियोजन तज्ज्ञांचे म्हणणे आहे.