वातावरणात कमालीचे चढउतार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:26 AM2018-10-30T05:26:32+5:302018-10-30T05:26:51+5:30
मुंबई ३८ अंशावरच राहणार; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता
मुंबई : आॅक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात मुंबईसह राज्याच्या वातावरणात कमालीचे चढउतार होत असून, कमाल तापमानाने कहर केला आहे. केवळ राज्य नाही, तर देशभरात कमाल तापमानाने उसळी घेतली असून, प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील वरळी, दादर, वांद्रे, सांताक्रुझ, गोरेगाव, मालाड, चारकोप, आकुर्ली, बोरीवली, चेंबूर, विद्याविहार, घाटकोपर, जोगेश्वरी, नेरूळ आणि पनवेल या ठिकाणांचे कमाल तापमान ३५ ते ३८ अंशादरम्यान नोंदविण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. कोकण, गोवा व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली ३० ते ३१ आॅक्टोबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. २ नोव्हेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
आकाश निरभ्र राहणार
मुंबई शहर आणि उपनगरात ३० आणि ३१ आॅक्टोबर रोजी आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८, २३ अंशाच्या आसपास राहील.