मुंबईसह कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा; येत्या २४ तासात प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 05:43 AM2021-09-13T05:43:35+5:302021-09-13T05:44:28+5:30
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. येत्या २४ तासात त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कमी दाबाच्या क्षेत्राचा पुढील प्रवास पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने होण्याची शक्यता आहे, याच्या परिणामामुळे पश्चिम किनारी पुढील तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. शिवाय राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक असणार असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त घाट भागातदेखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी मुंबईत पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. पहाटे, सकाळी आणि दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी अधून मधून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी दोन नंतर मात्र पावसाने मुंबईत बऱ्यापैकी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना सूर्यनारायणाने दर्शन दिले होते.
१३ ते १५ अतिमुसळधार
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १६ सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा जोर किंचित कमी होईल.