अतिवृष्टीचा इशारा कायम; मुंबईत पावसाची जोर‘धार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:01+5:302021-07-14T04:09:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट कायम असून, १४ जुलै रोजी कोकणात बहुतांशी ...

Extreme levels of flood danger were announced; Heavy rains in Mumbai | अतिवृष्टीचा इशारा कायम; मुंबईत पावसाची जोर‘धार’

अतिवृष्टीचा इशारा कायम; मुंबईत पावसाची जोर‘धार’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह कोकणाला हवामान खात्याने दिलेला ऑरेंज अलर्ट कायम असून, १४ जुलै रोजी कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. शिवाय किनारी भागात सोसाट्याचा वारा वाहील. सोमवारी कोसळलेल्या पावसानंतर मंगळवारी सकाळीदेखील मुंबईत पावसाचा मारा कायम होता. दुपार वगळता सकाळी आणि सायंकाळी मुंबईत बऱ्यापैकी पाऊस पडला.

सौराष्ट्र किनारीपट्टी ते पश्चिम - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत (दक्षिण महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओरिसा) कमी दाबाचा पट्टा असून, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबईतदेखील पावसाचा मारा कायम असून, तीन ठिकाणी बांधकामाचा भाग पडला. ११ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. २२ ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. सकाळी कोसळलेल्या पावसाने दुपारी मात्र विश्रांती घेतली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागली होती.

१४ जुलै रोजी मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल. घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातदेखील बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. १५ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

११ कामगार किरकोळ जखमी

सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मार्वे मालाड पश्चिम येथील आयएनएस हमला, नेव्ही मेन गेट येथे तात्पुरत्या तयार करण्यात येणाऱ्या सेटचा भाग कोसळला. या दुर्घटनेत ११ कामगार किरकोळ जखमी झाले. त्यापैकी दहा जणांना आयएनएस हमला येथे उपचार करून सोडण्यात आले. तर एका जखमी कामगारास ट्रायडंट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे.

Web Title: Extreme levels of flood danger were announced; Heavy rains in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.