मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित
५०० मीटर अंतरावरदेखील नीट दिसेना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्या वर्षात मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून मुंबईची हवा अत्यंत वाईट नोंदविण्यात येत आहे. सफरच्या नोंदीनुसार मुंबईच्या प्रदूषणाने कमाल पातळी गाठली आहे. विशेषतः येथील दृश्यमानतादेखील कमी होत असून, तज्ज्ञांकडून प्राप्त माहितीनुसार ५०० मीटर अंतरावरदेखील नीट दिसत नसल्याचे चित्र आहे.
२०२० हे वर्ष संपत असतानाच म्हणजे ३१ डिसेंबर रोजी मुंबईची हवा अत्यंत वाईट नोंदविण्यात आली होती. त्यानंतर यात बदल होतील, असे अपेक्षित होते. मात्र अचानक हवामानात बदल झाले. मुंबईत हवामान ढगाळ नोंदविण्यात आले. यात भर म्हणून की काय हवा शुद्ध होण्याऐवजी आणखी बिघडली. गेल्या पाच दिवसांपासून सलग मुंबईची हवा वाईट आणि अत्यंत वाईट नोंदविण्यात येत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला, वरळी, माझगाव, चेंबूर, अंधेरी, मालाड आणि अन्य परिसरात हवेची गुणवत्ता घसरली आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रदूषणाचे प्रमाण कायम आहे. मंगळवारदेखील सर्वसाधारणपणे असाच नोंदविण्यात आला आहे.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली आहे. वाहने मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आहेत. उद्योग-धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. रेल्वे अद्यापही सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झाली नाही. यामुळे खासगी वाहतुकीवर भर पडत आहे. या कारणाने प्रदूषण वाढत आहे. शिवाय आता रस्त्यांची कामेदेखील सुरू झाली आहेत. मेट्रोची कामे सुरू झाली आहेत. यातून उडणारी धूळ वातावरणात पसरत आहे.
धूर, धूळ यांच्या मिश्रणाने धुरके तयार होते आहे. यात ढगाळ वातावरण भर घालते आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून मुंबईची हवा अत्यंत प्रदूषित होते आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगर अधिक प्रदूषित असल्याचे चित्र आहे.