लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट असून, ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेला देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. सोमवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात कोसळलेल्या पावसाची ३५ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे. पुढील पाच दिवसांसाठी मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, किनारपट्टी भागात सोसाट्याचा वारा वाहील, असा अंदाज आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा तडाखा सुरू आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
२० जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, २१, २२ आणि २३ जुलै रोजी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टच देण्यात आला आहे. २१ आणि २२ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, तर मध्य महाराष्ट्रात घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.