कोकणला अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:04+5:302021-06-11T04:06:04+5:30
आज ऑरेंज, तर उद्यापासून तीन दिवस रेड अलर्ट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र व्यापलेल्या मान्सूनने पहिल्याच डावात ...
आज ऑरेंज, तर उद्यापासून तीन दिवस रेड अलर्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र व्यापलेल्या मान्सूनने पहिल्याच डावात यंत्रणांना गारद केले आहे. विशेषत: मुंबई महापालिकेचे सगळे दावे पावसाच्या पहिल्या पाण्यात वाहून गेले असतानाच आता दुसरीकडे १२, १३ आणि १४ जून रोजी संपूर्ण कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी या तिन्ही दिवशी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेसह राज्यस्तरावरील प्रशासकीय यंत्रणेचा कस लागणार आहे. दरम्यान, ११ जून रोजी संपूर्ण कोकणला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
११ जून रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. १२, १३ आणि १४ जून रोजी कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी होईल. विशेषत: किनारी भागात वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. अशा हवामानात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचेल. पूर येईल. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी होईल. पाणी साचल्याने याचा फटका वाहतुकीला, कच्च्या बांधकामांना बसेल. दरड कोसळण्याची शक्यता आहे. पिकांचेही अतोनात नुकसान होईल. नदीलगतच्या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. परिणामी या सगळ्यांना तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तयारी ठेवावी, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
................................