मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी दुपारी बारावाजेपर्यंत कोसळलेल्या पावसाने अडीचशे मिलीमीटरचा टप्पा गाठला असतानाच पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आता बुधवारी देखील मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्हयांना भारतीय हवामान शास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईत २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव म्हणून अरबी समुद्रावर पश्चिमेकडून येणा-या वा-याची गती वाढली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेसह कोकणात बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होईल. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हयांना मंगळवार सोबत बुधवारी रेड अर्लट देण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर समुद्र किनारे व समुद्र किना-यांलगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे. तसेच एखादया ठिकाणी पाणी साचले असल्यास त्याठिकाणी जाणेही टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. सर्व विभागीय नियंत्रण कक्षांना आवश्यक मनुष्यबळ साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलास त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना अणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिका-यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज सांगण्यात आला असून मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई, ठाणे आणि रायगडला अतिवृष्टीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 5:10 PM