Join us

मुंबईच्या वीस टक्के किनारपट्टीला पुराचा अतितीव्र धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:06 AM

संशाेधनातील निष्कर्षलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीचा मुंबईच्या किनारपट्टीला असलेला धोका या विषयावर नुकतेच एक ...

संशाेधनातील निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : समुद्राच्या पाणी पातळीतील वाढीचा मुंबईच्या किनारपट्टीला असलेला धोका या विषयावर नुकतेच एक संशोधन झाले. त्यानुसार १९७६ ते २०१५ दरम्यान जमिनीच्या उपयोगात केलेले बदल, दलदल, पाणीसाठे आणि खारफुटीच्या जंगलांचा विध्वंस करणाऱ्या अशाश्वत विकासामुळे मुंबई किनारपट्टीचा सखल भाग हा समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे अतिसंवेदनशील बनला असून, यामुळे मुंबईच्या वीस टक्के किनारपट्टीला पुराचा अतितीव्र धोका आहे.

उत्तरेला मीरा-भाईंदरपासून दक्षिणेला अलिबागपर्यंतचा भाग समाविष्ट असलेल्या या संशोधनात मुंबई महानगर प्रदेशाची विशेषतः दक्षिण आणि पूर्व उपनगरांतील ५०.७५ किलोमीटरची किनारपट्टी अतिसंवेदनशील बनली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या वाढत्या पातळीचा थेट परिणाम म्हणून भविष्यात या भागात दरवर्षी पूर संभवतो, असा इशारा अभ्यासाअंती देण्यात आला. बोरिवली आणि अंधेरीसारखे भाग कमी संवेदनशील असतील तर गोराई (मुंबई), उत्तन, उरण आणि अलिबाग (रायगड) हे भाग मध्यम ते तीव्र संवेदनशील असतील.

हा संशोधन अभ्यास तज्ज्ञांच्या तपासणीनंतर विज्ञानविषयक प्रकाशनात प्रसिद्ध करण्यात आला. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, थायलंड, देशप्राण कॉलेज ऑफ टिचर्स एज्युकेशन, मेदिनीपूर, पश्चिम बंगाल आणि स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, भोपाळ या संस्थांमधील संशोधकांनी यात सहभाग घेतला. मुंबई किनारपट्टीच्या या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठीचे धोरण आखण्यासाठी वरील अभ्यासाचे निष्कर्ष मार्गदर्शक म्हणून वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.

* उद्ध्वस्त झालेल्या नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन गरजेचे!

संशोधकांच्या मतानुसार, उच्चस्तरीय विकासकामे आणि दर वर्ग किलोमीटरमधील वाढत्या लोकसंख्येमुळे किनारपट्टीची झीज होत आहे. पर्यटन आणि मासेमारीसारख्या कृतींमुळे विशेषतः दक्षिण आणि पूर्व उपनगरांच्या किनारपट्टीवर विपरीत परिणाम होत आहेत. शाश्वत विकासाबरोबरच जगण्याच्या पर्यायी पद्धती आणि उद्ध्वस्त झालेल्या नैसर्गिक परिसंस्थेचे, स्रोतांचे संवर्धन गरजेचे आहे.

--------------------------------------