लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नॉनकोविड महिला डोळा गमावणार अशी स्थिती असतानाही सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत ४३ वर्षीय महिलेची दृष्टी मिळवून देण्याचे काम कोरोना योद्ध्यांनी केले आहे. नॉनकोविड असो वा कोरोनाबाधित रुग्ण त्याची योग्य काळजी घेत त्याच्यावर उपचार करणे यामुळेच सध्या महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे.
आयटी प्रोफेशन असलेली सीमा नावाची महिला नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. लॉकडाउन असल्यामुळे सध्या त्या घरूनच काम करत होत्या. एके दिवशी रात्री त्या घरात अचानक पाय घसरून पडल्या. यामध्ये टेबलावर आदळल्याने त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. यातच त्यांनी चष्मा घातला असल्यामुळे दुखापत आणखी गंभीर झाली. डोळ्यात रक्ताच्या गाठी झाल्या. त्यामुळे तातडीने कुटुंबीयांनी त्यांना नवी मुंबई येथे उपचारांसाठी दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाही रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही.
सीमा यांच्या डोळ्यातील बुब्बुळ अक्षरश: बाहेर लटकत होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शस्त्रक्रिया तातडीने कशी करणार असा प्रश्न होता. मात्र प्रा. डॉ. नयना पोतदार आणि आॅक्युप्लास्टिक सर्जन डॉ. गुंजन राठी यांच्या नेतृत्वाखाली नेत्ररोग तज्ज्ञांच्या टीमने जबाबदारी घेत तातडीने आवश्यक प्रकिया करून शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेत अक्षरश: बाहेर लटकणारे बुब्बुळ शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरीत्या बसवून डोळा वाचवला. यानंतर काही दिवस झूम अॅपच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात आली. नेत्र विभागाच्या डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेऊन ही शस्त्रक्रिया केल्यामुळेच डोळा वाचल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. १९०हून जास्त कार्डियाक प्रोसिजर करण्यात आल्या, या रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू असल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले.तातडीने निर्णयडॉक्टरांनी तातडीने निर्णय घेऊन ही शस्त्रक्रिया केल्यामुळेच डोळा वाचल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.