लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आदित्यज्योत फाऊंडेशनने ट्विंकिंग लिटल आईस या स्वयंसेवी संस्थेसह नुकतेच मुंबई महानगरपालिका प्रशासन सामंजस्य करार केला. या अंतर्गत शहर उपनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, या पार्श्वभूमीवर वडाळा येथे रेमेडिओ फंडस कॅमेरा वापरून शुक्रवारी नेत्र तपासणी शिबिर पार पडले, यात ३९ व्यक्तींची नेत्र तपासणी कऱण्यात आली, तसेच या व्यक्तींना डायबेटिक रेटिनोथेरपी शस्त्रक्रिया कऱण्यात येणार आहे.
आदित्यज्योत फाऊंडेशनने ट्विंकिंग लिटल आईस या स्वयंसेवी संस्थेसह हाती घेतलेला उपक्रम संपूर्णतः विनाशुल्क आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट २०२५ पर्यंत डायबेटिक ब्लाइंड फ्री मुंबईचे आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आदित्यज्योत फाउंडेशनच्या मोबाईल नेत्रतपासणी व्हॅनद्वारे तपासणी करण्यात येते, राज्यात या संस्थेकडे अशा स्वरुपाची एकमेव व्हॅन उपलब्ध आहे.
या उपक्रमाअंतर्गत २०१८-१९ साली शिबिरात १ हजार ८८० व्यक्तींना तपासण्यात आले, तर २०१९-२० साली ६२३ व्यक्तींची तपासणी कऱण्यात आली. २०२०-२१ साली या उपक्रमाच्या माध्यमातून शहर उपनगरातील ५२ पालिका दवाखान्यात जाऊन तपासणी कऱण्याचा मानस आहे. याविषयी, आदित्यज्योत आय रुग्णालयाचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक तसेच ज्येष्ठ नेत्रविकारतज्ज्ञ डॉ. एस. नटराजन यांनी सांगितले, २०२५ पर्यंत मुंबईत डायबेटिक ब्लाइंड फ्री करण्याचे स्वप्न आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये मधुमेहामुळे नेत्रांच्या समस्या उद्भवतात, त्याचे उशिरा निदान झाल्याने अंधत्वाचा धोका असतो. त्यामुळे या रुग्णांना मोफत सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या उपक्रमांचे आयोजन करण्यावर अधिकाधिक भर देण्यात येत आहे.