मुंबई : डोळ्यांच्या काचबिंदूसाठी वापरल्या जाणाऱ्या पिलोकार्पिन या औषधाची तीव्रता कमी करून एका खासगी कंपनीने नवीन औषध बाजारात आणले आहे. या औषधाच्या वापरामुळे जवळचे वाचण्यासाठी चष्म्याची गरज भासणार नाही, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. मात्र, पात्र रुग्णांनाच हे औषध उपयुक्त असून त्यामुळे सरसकट सगळ्यांचाच चष्मा जाईल, असे म्हणणे योग्य ठरणार नसल्याचे नेत्ररोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
पिलोकार्पिन हे औषध काचबिंदूच्या रुग्णांसाठी वापरले जाते. नवे औषध ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी या औषधाचे ड्रॉप्स डोळ्यात टाकल्यानंतर ज्यांना जवळचा वाचायचा चष्मा आहे, त्यांना तो लावायची गरज पडणार नाही असे औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीचा दावा आहे. मात्र, नेत्ररोगतज्ज्ञांनी हे औषध वापरताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
ज्यांना मोतीबिंदू आहे, तसेच दूरचा चष्मा जे वापरतात, त्यांना या औषधाचा फायदा होणार नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचा वापर कोणीही करू नये, तसेच या औषधामुळे दृष्टी धूसर होणे वा डोके दुखणे हे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. - डॉ. चारुता मांडके, नेत्ररोग विभागप्रमुख, कूपर हॉस्पिटल.जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय )
जवळचा चष्मा असलेल्यांना या औषधामुळे काही प्रमाणात दिसण्यास मदत होईल. मात्र, त्यांना हे औषध दिवसातून तीनदा डोळ्यांत टाकावे लागेल. औषधामुळे बाहुलीचा आकार कमी होऊन प्रिस्बायोपियावर उपचार केला जातो. मात्र, या औषधामुळे जवळचा चष्याचा नंबर सरसकट जातो हे म्हणणे चूक आहे.- डॉ. शशी कपूर, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ
नेत्रगरोग तज्ज्ञच रुग्णाची योग्य तपासणी करून सांगू शकेल की, हे नवीन औषध त्या रुग्णाला फायदेशीर आहे किंवा नाही. ज्यांना लांबचा नंबर आहे, त्यामध्ये रेटिना डिटॅचमेंट (ज्यामुळे तीव्र वेदनारहित दृष्टी नष्ट होते) होण्याची शक्यता अधिक असते. त्यांना हे औषध घातल्यास धोका वाढू शकतो.- डॉ. सुनील मोरेकर, रहेजा फोर्टिस रुग्णालय