लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्याप्रमाणे सामान्य आजारांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जाते त्याप्रमाणेच डोळ्यांच्या स्वास्थ्याकडेही लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन ऑरोलॅबचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम यांनी केले. याच पार्श्वभूमीवर आदित्य ज्योत फाउंडेशनने हाती घेतलेला उपक्रम झोपडपट्टी परिसरातील नागरिकांसाठी उत्तम असून या उपक्रमामुळे आरोग्याचे गांभीर्य समजेल, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. एन. एस. सुंदरम् यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त ‘आदित्य ज्योत फाउंडेशन फाॅर ट्विन्कलिंग लिटल आईज्’ यांनी मंगळवारी धारावी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात सुमारे १३१ व्यक्तींची नेत्र तपासणी केली. शिबिरात १६ व्यक्तींना मोतीबिंदूचे निदान झाले. तर, अन्य १५ रुग्णांना डोळ्यांच्या आजारांचे निदान झाल्याचे दिसून आले. या शिबिरात २१ मधुमेहींच्या डोळ्यांचीही तपासणी करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिबिरादरम्यान परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक संस्थांना डोळे तपासण्यासाठीची उपकरणे दान करण्यात आली. त्याचप्रमाणे, शिबिरात तपासलेल्या व्यक्तींना पुढील उपचारांसाठी विविध रुग्णालयांत संदर्भित करण्यात आले.
या शिबिराच्या आयोजनाविषयी आदित्य ज्योत फाउंडेशनचे सीएमडी ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. एस. नटराजन यांनी सांगितले की, मधुमेहाला प्रतिबंध करता येऊ शकत नाही; पण त्यातून येणारे अंधत्व हे नक्की रोखता येते. त्यासाठी नेत्रतपासणीचे मोठे जाळे निर्माण करण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्यातून मधुमेहामुळे नेत्रपटलावर होणाऱ्या दुष्परिणामांचे निदान होऊन भविष्यातील गुंतागुंत टाळता येते. नेत्रउपचारांच्या सुविधा देशातील शहरी भागांमध्ये केंद्रित झाल्या आहेत; पण आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून उपचारांच्या या सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहाेचविण्याचा उपक्रम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेतला आहे. मधुमेहामुळे येणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचे सर्वांत मोठे आव्हान देशाच्या आरोग्य क्षेत्रापुढे आहे. लवकर अचूक निदान, प्रभावी उपचार आणि त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत या त्रिसूत्रीने मोठ्या संख्येने येणारे अंधत्व आपण नियंत्रित करू शकतो.
......................