आपल्या हृदयाप्रमाणेच डोळ्यांच्या आरोग्यविषयक समस्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मात्र, या समस्यांकडे आपण कायमच दुर्लक्ष करतो. त्यामुळे उशिरा निदान झाल्यामुळे त्यावर उपचार करणे कठीण होते. बरेचदा नेत्रतज्ज्ञांकडे येणाऱ्या ८५ टक्के रुग्णांमध्ये डोळ्यांच्या समस्यांचे उशिराने निदान होते. हे चुकीचे असून, रुग्णांनी कोरोनाच्या काळातही योग्य ती खबरदारी घेऊन उपचार घेतले पाहिजेत, असा महत्त्वाचा सल्ला ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. एस. नटराजन यांनी दिला आहे.
हल्ली वेळेच्या आत जन्माला येणारी बालके, जन्माच्या वेळी जेमतेम १,००० ग्रामपेक्षा कमी वजन असलेली बालके प्रगत वैद्यकीय तंत्राचा आधार घेऊन वाचविता येऊ शकतात, असे नमूद करीत डॉ.नटराजन म्हणाले, मुळात गर्भातल्या बाळाची वाढ ही तिसऱ्या महिन्यापासूनच सुरू होते. गर्भात गरोदरपणातल्या टप्प्यावर एकेक अवयवही विकसित होत असतात. वेळेच्या आत जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये रेटिना विकसित होण्यात अडसर येतो. शिवाय अतिप्रकाशामुळे अशा बालकांच्या डोळ्यातील आतल्या पडद्यावरही परिणाम होण्याची जोखीम असते. रेटिनाला वाहिन्यांद्वारे योग्य प्राणवायू पोहोचत नाही. त्यामुळे शरीर पर्यायी रक्तवाहिन्या विकसित करते. हे दृष्टीसाठी धोक्याचे ठरते. हे टाळण्यासाठी लेझर ट्रिटमेंट उपलब्ध आहे. प्रदीर्घ काळातल्या मधुमेहातही रेटिना खराब होण्याची जोखीम असते. मधुमेहातली ही शक्यता टाळता येऊ शकते. अनेकदा डोळ्यांना जखमा झाल्याने रुग्ण उपचाराला येतात. विशेषत: अपघाती रुग्ण आणि खेळाडूंमध्ये हे प्रमाण अधिक आहे. जराशी काळजी घेतली, तर शरीराचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि दृष्टी देणारा हा अवयव वाचविला जाऊ शकतो, याकडे डॉ.नटराजन यांनी लक्ष वेधले.
प्रगत झालेल्या वैद्यकशास्त्रामुळे सरासरी आयुष्यमानात वाढ झाली आहे. दुर्धर व्याधीही आटोक्यात येऊ शकतात. गरोदरपणातल्या जोखिमा ओळखताही येतात. मात्र, अनेक जोखिमा टाळता येत नाहीत. गर्भातल्या बाळाची शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे वाढ होण्यासाठी किमान ३६ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र, अनेकदा ही नैसर्गिक साखळी खंडित होते. त्यामुळे मुदतपूर्व बाळंतपणे होतात. अशा वेळी डोळ्यांमधील रेटिना विकसित न झाल्याने या बालकांना अंधत्वाचे धोके असतात, असे डॉ.नटराजन यांनी सांगितले.
देशात नेत्रविकार असलेले असंख्य रुग्ण आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सर्वच लोकांना परवडत नाही. त्यामुळे भारतीय नेत्रतज्ज्ञांनी संशोधन, नवीनता, तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रभावी कामगिरी करावी व आपल्या संशोधनाचा लाभ सर्वसामान्य गरजूंना करून द्यायला हवा. आपल्या देशात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली होती. अलीकडच्या काळात नेत्रविकार चिकित्सेवर देशात चांगले संशोधन झाले आहे. नेत्रदान चळवळ, नेत्रविकार, तसेच मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार यांबद्दल समाजात अधिक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावी पिढीला नेत्रविकारांबाबत जागरूक करण्यासाठी नेत्रविकार तज्ज्ञांच्या संघटनेने पुढाकार घेऊन, या क्षेत्रात अधिक परिणामकारक संशोधनाचे कार्य हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
व्हाॅट्सॲप व्हिजन सिंड्रोमचा धोका
वर्क फ्राॅम होम, ऑनलाइन स्कूलिंगमुळे लहान मुलांसह मोठ्यांमध्येही मोबाइल वापराचे प्रमाण वाढत आहे. मोबाइलचा वाढता वापर नुकसानदायक ठरू शकतो. दिवस-रात्र फोन, कॉम्प्यूटर, टीव्हीचा वापर डोळ्यांवर नकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे व्हाॅट्सॲप व्हिजन सिंड्रोम किंवा सोशल मीडिया व्हिजन सिंड्रोमचा धोका वाढत चालला आहे. यावर उपाय म्हणून २०-२० चा फॅार्म्युृला वापरला पाहिजे. शिवाय डोळ्यांच्या दुखण्यासह मानेचे दुखणे, स्नायूंवर येणारा दाब, पाठदुखी आणि तणाव यासारख्या समस्या दिसून येत आहेत. परिणामी, कोणत्याही स्क्रीनवर काम करताना वीस मिनिटांनंतर ब्रेक घेणे वा डोळ्यांची उघडझाप करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल, असा सल्ला डॉ. नटराजन यांनी दिला. नियमित व्यायाम, संतुलित आहाराचे सेवन केल्याने नक्कीच फायदा होतो. स्क्रीनवर काम करताना किंवा ऑनलाइन वर्गानंतर थोडी विश्रांती घेणे आवश्यक आहे. योगा, सूर्य नमस्कार, स्ट्रेचिंग, पाठीचे, मानेचे, तसेच खांद्याच्या व्यायामाची निवड करा. मानेचा ताण टाळण्यासाठी संगणक आणि मोबाइल स्क्रीन डोळ्यांच्या समान पातळीवर असावा. सकाळी कोवळ्या उन्हात उघडे अभे राहून पुरेसे व्हिटॅमिन डी घ्यावे. प्रथिने समृद्ध आहाराची निवड करा, गुडघ्यांवर ताण येणार नाही, अशा अवस्थेत बसणे योग्य राहील.
अंधत्व निवारण कार्यक्रमात काळानुरूप बदल आवश्यक
देशात अंधत्व निवारणासाठी स्वतंत्र राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सन १९७६ पासून राबविण्यात येत आहे. अंधत्वाची समस्या दूर करण्यासाठी दृष्टी २०२० हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. २०२० पर्यंत देशातील अंधत्वाचे प्रमाण हे ०.३ टक्के इतके खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर नेत्रतज्ज्ञ काम करीत आहेत. मात्र, त्यासाठी या धोरणातही काळानुरूप बदल करण्याची गरज आहे.
नेत्रदानासाठी समांतर धोरणाची गरज
देशात दरवर्षी वरील कारणास्तव व आजारामुळे २० लाख लोक आपली दृष्टी गमावत असतात. यावर उपाय म्हणजे अपारदर्शक बुब्बुळ काढून त्याऐवजी दात्याचे स्वच्छ व पारदर्शक पातळ बुब्बुळ प्रत्यारोपण करून आलेले अंधत्व दूर करणे होय. कॉर्निया रोपणाद्वारे दृष्टिदान मिळावे, यासाठी प्रतीक्षा करणाऱ्यांचे देशातील संख्या ५० लाखांच्या जवळपास असून, यात २६ टक्के मुले आहेत. दृष्टिहिनांच्या संख्येत प्रतिवर्षी हजारोंची भर पडतच आहे. भारतात गुजरात, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात नेत्रदानासाठी समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, अजूनही नेत्रदानाविषयी राज्या-राज्यातील नियम-सूचनावलीत तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासाठी केंद्रीय स्तरावर निर्णय घेऊन, सर्व राज्यांसाठी अवयवदानाबाबत एकच नियमावली करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा डॉ.नटराजन यांनी व्यक्त केली.
..............................................................................................................................................