मुंबई : गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये मेट्रो-३च्या कारशेडसाठी २ हजार २३८ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या वतीने वृक्षतोडीविरोधात दर रविवारी मानवी साखळी उभारून आंदोलन छेडले जाते. या रविवारचे आंदोलन पोलिसांच्या वाढलेल्या फौजफाट्यामुळे थंडावल्याचे चित्र दिसून आले. यावेळी सुमारे पाचशे आंदोलकांनी आंदोलनात सहभाग घेतला.‘मिळवून सारे वाचवू या आरे...’, ‘अंदर की बात है... पोलीस हमारे साथ है’, ‘सेव्ह आरे सेव्ह मुंबई’, ‘सेव्ह आरे फोरेस्ट’ इत्यादी घोषणा आंदोलकांनी देऊन मेट्रो कारशेडचा विरोध केला. समर्थ फाउंडेशन, म्यूझ, आरे कन्झर्व्हेशन ग्रुप, आरे वाचवा आरे जगवा ग्रुप, एव्हरीवन फॉर आरे इत्यादी ग्रुपच्या आंदोलकांनी मानवी साखळी तयार करून निषेध व्यक्त केला. अंबरनाथ येथून लुनार फाउंडेशनच्या २५ लहान मुलांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.मुंबईसाठी आरे जंगल किती महत्त्वाचे आहे. जंगलाचा ºहास झाला, तर आदिवासी बांधवांची परंपरा संपुष्टात येईल, या विषयावर तरुणाईने पथनाट्य सादर केले. काही आंदोलकांनी आरेवर गाणी लिहून आणली होती. ती डफ आणि कांगो या वाद्याच्या तालावर गाणी म्हटली गेली. तरुणाईसह लहान मुले वाद्याच्या तालावर थिरकत होती. काही आंदोलकांनी सोमवारच्या न्यायालयीन सुनावणीचे निमंत्रण उपस्थितांना दिले. सुनावणीला मोठ्या संख्येने मुंबईकरांनीहजर राहण्याचे आवाहन पर्यावरणवाद्यांनी केले.पोलीस सज्जआरे पोलीस ठाणे, दिंडोशी पोलीस ठाणे, एसआरपीएफ पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. सकाळी ११.३०च्या सुमारास आरे पिकनिक पॉइंट येथील दुकानही बंद करण्यात आली. आंदोलकांनी शांततेत लढा सुरू ठेवल्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केली जाते.आम्ही माहुल प्रकल्पग्रस्त जे भोगत आहोत, ते मुंबईकरांच्या वाट्याला येऊ नये, असे वाटत असेल तर... आरे वाचवा, असा संदेश माहुल प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनादरम्यान मुंबईकरांना दिला.
आरे : वृक्षतोडीविरोधातले आंदोलन थंडावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:51 AM