Join us

बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराला धमकीचा फोन; केली मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2024 1:59 PM

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत

Baba Siddique Murder Case : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला धमक्या आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी तक्रारीच्या आधारे मुंबईतील खार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ही धमकी आल्याचे म्हटलं जात. मात्र  अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी  यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. मात्र आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असलेल्या व्यक्तीला फोनवरुन धमक्या देण्यात आल्या आहेत. एका अज्ञात व्यक्तीने साक्षीदाराला फोनवरुन धमकी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. धमकी देणाऱ्याने पाच कोटींची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करण्याची धमकी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. एकतर ५ कोटी रुपये दे नाहीतर तुला बाबा सिद्दीकीप्रमाणे मारून टाकू, अशी धमकी त्याने प्रत्यक्षदर्शी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा फोन कोणी केला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. याशिवाय लॉरेन्स बिश्नोई गँगने याची जबाबदारी घेतलेली नसली तरी त्यांनीच फोन केल्याचे म्हटलं जात आहे.

 बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. निर्मल नगर भागात बाबा सिद्दीकी आमदार झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात गेले होते. तेथून निघताना तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यावरील हल्ल्याची जबाबदारी गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांनी घेतली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना ताब्यात घेतले आहे.

२६ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील लुधियाना येथून पंधराव्या आरोपीला अटक करण्यात आली होती. सुजीश सुशील सिंग असे आरोपीचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाबींमधून तपास करत आहेत. बाबा सिद्दीकी यांची सलमान खानशी जवळीक असल्याने त्यांच्यावर हल्ला झाला असावा, असे मानले जात आहे. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई गँगबाबतही पोलिसांकडून तपास सुरु आहे.

दरम्यान, झीशान सिद्दीकींचे म्हणणे आहे की, त्यांचे वडील गरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवत होते, त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबई पोलीसगुन्हेगारी