मुंबई : पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीचे रूपडे बदलण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. यासंदर्भात प्रारंभिक भाग म्हणून सद्य:स्थितीत या वसाहतीच्या देखभाल-दुरूस्तीसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आणि तातडीच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.वांद्रे शासकीय वसाहतीच्या संदर्भातील विविध मागण्यांच्या अनुषंगाने गुरूवारी दुपारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत चव्हाण यांनी ही माहिती दिली. या बैठकीला आमदार झिशान सिद्दिकी, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार बाबा सिद्दिकी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकाम) अजित सगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि वसाहतीतील रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत आमदार सिद्दीकी, आमदार चौधरी आणि रहिवाशांच्या प्रतिनिधींनी तेथील समस्यांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागानेही एक सादरीकरण करून तेथील परिस्थिती मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी चव्हाण यांनी राज्य सरकार वांद्रे वसाहतीतील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले.या वसाहतीत नवीन इमारती उभारण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाला असून, तोवर सध्याच्या इमारतीत सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले.
वांद्रे शासकीय वसाहतीचे रूपडे बदलणार - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 1:41 AM