मुंबईत हाेणार फेस ट्रान्सप्लांट; वरदान ठरणारी शस्त्रक्रिया
By संतोष आंधळे | Published: April 23, 2023 11:33 AM2023-04-23T11:33:21+5:302023-04-23T11:34:35+5:30
जन्मजात दोष असलेल्या, रुग्णांसाठी चेहरा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वरदान ठरणार आहे.
हिंदी, इंग्रजी चित्रपटांमध्ये प्लास्टिक सर्जरी करून चेहरा बदलल्याचे दाखविले जायचे; अशा पद्धतीने खरंच चेहरा बदलला जाऊ शकतो, याबाबत साशंकता होती; वैद्यकीय विश्वात झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. भारतातही ‘फेस ट्रान्सप्लांट’ करता येऊ शकते, इतके प्रगत तंत्रज्ञान, वैद्यकीय तज्ज्ञांकडे ते करण्यासाठीचे कौशल्य आले आहे. त्यामुळे आता अशा स्वरुपाची शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील रुग्णालयात सुरू होणार आहे. त्यामुळे ज्या रुग्णांचा चेहरा ॲसिड हल्ला किंवा एखाद्या अपघाताने विद्रूप झाला आहे किंवा विशिष्ट रोग, जन्मजात दोष असलेल्या, रुग्णांसाठी चेहरा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वरदान ठरणार आहे.
संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी
आपल्याकडे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केंद्र शासनाच्या मानवी अवयव आणि उती पेशी प्रत्यारोपण कायदा - ११९४ नुसार केल्या जातात. शरीरातील अन्य अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी जे नियम लागू होतात, ते सर्व नियम फेस ट्रान्सप्लांटसाठी लागू असणार आहेत. फेस ट्रान्सप्लांटसाठी मेंदूमृत व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हनुवटीच्या खालच्या भागापासून ते डोक्याच्या मध्यभागापर्यंतची त्वचा घेतली जाते. दात्याच्या चेहऱ्यावरील त्वचेसोबत स्नायू, नस, रक्तवाहिन्या, स्नायूला जोडणाऱ्या पेशी, हाडे घेतले जातात. तसेच दात्यांच्या देहाचा आदर राखूनच सगळ्या गोष्टी केल्या जातात. नातेवाईकांकडे देह सोपविताना थ्री डी प्रिंटिंगचा वापर करून रेग्झिनच्या साहाय्याने मास्क बनवून चेहरा झाकला जातो.
फेस ट्रान्सप्लांट विषयावर पॅरिसमध्ये मोठे काम झाले आहे. जॉर्जेस पॉम्पीडू हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. लॉरेंट लाँटेरी यांनी १० पेक्षा अधिक फेस ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. ही शस्त्रक्रिया सुंदर दिसण्यासाठी नव्हे तर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्यास केली जाते.
हुबेहूब दिसणार नाही
दात्याकडून ज्यावेळी चेहरा घेतला जाईल, त्यावेळी रुग्णाचा आणि दात्याचा रक्तगट जुळणे गरजेचे आहे. या शस्त्रक्रियेला चेहऱ्यावर किती गंभीर इजा आहे.
त्यावर त्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा वेळ अवलंबून राहणार आहे. दात्याच्या चेहऱ्यावरून त्वचा आणि रक्तग्रंथी घेतल्या म्हणजे प्रत्यारोपणानंतर रुग्णाचा चेहरा दात्यासारखाच चेहरा दिसेल असे नाही. कारण दात्याच्या चेहऱ्यावरील हाडाच्या रचनेप्रमाणे ती त्वचा बसविण्यात येणार आहे.
मेंदूमृत चेहरा मिळविण्याचे आव्हान
अवयवदानाबाबत जनजागृती होत असली तरी त्या प्रमाणात अवयवदान होताना दिसत नाही; मात्र गेल्या दोन वर्षांत ७ हातांच्या प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत; मात्र आपल्या प्रिय मेंदूमृत व्यक्तीचा चेहरा प्रत्यारोपणासाठी देण्याचा धाडसी निर्णय नातेवाईक घेतील का? त्यावर फेस ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
राज्यात परळ (मुंबई) येथील ग्लोबल रुग्णालय आणि केईएम या दोनच रुग्णालयांना फेस ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेची परवानगी दिली आहे. परवानगी देताना रुग्णालयाची संबंधित शस्त्रक्रिया करण्याची क्षमता, पायाभूत सुविधा, कौशल्यप्राप्त मनुष्यबळ याचा विचार हाेतो.
- डॉ. अरुण यादव, सहायक संचालक, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा,
आरोग्य विभाग
२५ ते ३० लाख खर्च
ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला पुढील काही वर्षे ‘रिजेक्शन’ येऊ नये म्हणून काही विशिष्ट गोळ्या मोठ्या काळासाठी चालू ठेवाव्या लागतात. या शस्त्रक्रियेसाठी २० ते २५ लाखांपेक्षा अधिक खर्च येतो.
मी परदेशात अनेक वैद्यकीय परिषदांना हजेरी लावली आहे. पॅरिसचे डॉक्टर या विषयात मोठे काम करत आहेत. या शस्त्रक्रियेसाठीच्या सर्व गोष्टी आपल्या रुग्णालयात आहेत. या शस्त्रक्रियेचे मूळ तत्त्व प्लास्टिक सर्जरीसारखेच आहे. रक्तवाहिनीसोबत दात्याच्या चेहऱ्याच्या रक्तवाहिन्या जुळविणे, रक्तप्रवाह सुरळीत करणे हे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही. हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेचा चांगला अनुभव पाठिशी आहे. या शस्त्रक्रियेसाठी १० ते १२ सर्जन, ४ ते ५ ॲनेस्थेसिस्ट डॉक्टरांची टीम लागते. या शस्त्रक्रियेसाठी दात्याकडून चेहरा मिळणे, हे मोठे आव्हान आहे.
- डॉ. नीलेश सातभाई,
संचालक, प्लास्टिक सर्जरी,
हात प्रत्यारोपण विभाग, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई