Join us

फेसबुक फ्रेंडशी लग्न करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:49 AM

पीडित मुलीचे वडील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात

मनीषा म्हात्रे ।मुंबई : फेसबुकवर चांगला फोटो ठेवत त्याने तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर पुण्यामध्ये मोठी संपती असल्याची बतावणी करत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तरुणी आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच आईच्या मृत्यूची बातमी सांगत तिच्याशी लग्नही केले. लग्नानंतर मात्र त्याचे खरे रूप समोर आले. घरामध्ये डांबून ठेवत नशेच्या गोळ्या घेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. स्वत:च्या मर्जीने लग्न केले असल्याने ती हे अत्याचार निमूटपणे सहन करत होती. पण, पती आधीपासून विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती तिला समजली. त्यामुळे एके दिवशी संधी साधून तिने घरातून पळ काढत माहेर गाठले. ही कहाणी आहे गोराईमधील २९ वर्षीय सुशिक्षित तरुणीची. याबाबत बोरीवली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.पीडित मुलीचे वडील रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात, तर आई गृहिणी आहे. अशातच सुहानीने (नाव बदलले आहे) बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले. ती एका मेडिकल दुकानात नोकरी करू लागली. दरम्यान, सप्टेंबर २०१६ मध्ये तिला नवतुषार सुनानिया नावाच्या ३८ वर्षीय तरुणाची फेसबुकवरून फ्रेंडरिक्वेस्ट आली. तरुणाचे प्रोफाइल चांगले वाटल्याने तिने ही रिक्वेस्ट स्वीकारली. फेसबुक फ्रेंड बनलेल्या नवतुषार याने तिच्याशी ओळख वाढवत मैत्री केली. दोघेही फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि मोबाइलवर बोलू लागले.मी गेली दहा वर्षे विदेशात नोकरी केली. शिक्षणाच्या जोरावर चांगला पैसा कमावला असून पुण्यात तब्बल ११ मालमत्ता खरेदी केल्या आहे. मात्र विदेशात असल्याने मला लग्न करता आले नाही. मात्र एका मुलीसोबत मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. घरी आई-वडील आणि बहीण आहे. मात्र तिघेही मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने मी स्वतंत्र राहतो. मैत्रीण म्हणून तुला मी सगळे सांगितले आहे, अशा भावनिक जाळ्यात ओढत, तू माझ्याशी लग्न करशील, असा प्रस्तावच नवतुषारने तिच्यासमोर ठेवला.मुलगा चांगला असल्याने ती नकार देऊ शकत नव्हती. मात्र तो यापूर्वी एका मुलीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचे सुहानी घरीही सांगू शकत नव्हती. नोव्हेंबर महिन्यात सुहानीचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी नवतुषार मुंबईत आला. त्याने पुन्हा एकदा तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. उच्च राहणीमानामुळे नवतुषार प्रत्यक्षातही तिला आवडला. तिने लग्नाला होकार दिला. सुहानी आपल्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच गेल्या वर्षीच्या १ जानेवारीला आई ब्रेन हॅमरेजमुळे वारल्याचे सांगत त्याने लग्न लवकर करावे लागेल, असे तिला सांगितले.नवतुषारच्या पे्रमात अडकलेल्या सुहानीलाही त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. त्याच्या अडचणींचा विचार करून तिने होकार देताच, दोघांनीही १७ तारखेला लग्न करण्याचे ठरविले. गिरगावातील आदर्श हिंदू वैदिक विवाह कार्यालयात दोघेही विवाहबद्ध झाले. त्यानंतर सुहानी त्याच्यासोबत पुण्यातील गोखले नगरात असलेल्या त्याच्या घरी राहायला गेली.लग्नानंतर काही दिवसांतच नवतुषारने आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. नशेच्या आणि लैंगिक उत्तेजना निर्माण करणाऱ्या गोळ्या खाऊन तो सुहानीवर लैंगिक अत्याचार करू लागला. यामुळे सुहानी आजारी पडली. तिला डॉक्टरकडे न नेता, तो घरीच औषधे आणून देत होता. तसेच किरकोळ कारणावरून वाद घालून भांडणे करत तो तिला मारहाणदेखील करायचा. मात्र स्वत:च्या मर्जीने विवाह केला असल्याने सुहानी हे अत्याचार निमूटपणे सहन करत होती. एके दिवशी नवतुषारच्या मोबाइलमध्ये एका महिलेचा फोटो बघून सुहानीने त्याच्याकडे विचारणा केली असता ती फक्त मैत्रीण असल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली.नवतुषार आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच सुहानीने घरच्या कपाटात शोध घेतला असता नवतुषारचे वय ४७ वर्षे असून त्याचे यापूर्वीच लग्न झाले आहे. त्याला दोन मुले असून ते आईसोबत औंध परिसरात राहत असल्याची धक्कादायक माहिती तिला समजली. अखेर सुहानीने संधी साधून नवतुषारचा मोबाइल सोबत घेऊन घरातून पळ काढला. तिने माहेर गाठून आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. तोपर्यंत नवतुषारने पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस ठाणे गाठून पत्नी हरविल्याची तक्रार दिली.नवतुषारसोबत पुणे पोलिसांचे फोन येऊ लागल्याने गेल्या वर्षीच्या ११ नोव्हेंबरला सुहानी पुण्याला गेली. सुहानीसोबत विवाह झाला नसून मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे नवतुषारने पुणे पोलिसांसमोर सांगितले. यावरून पोलिसांसमोरच दोघांमध्ये वाद झाले. अखेर पोलिसांनी सुहानीचा जबाब नोंदवून घेत तिला रेल्वे स्थानकात नेऊन सोडले. सुहानीने मुंबई गाठली. त्यानंतर सुहानीच्या वडिलांनी नवतुषारला मुंबईत बोलावून घेतले. ११ डिसेंबर रोजी नवतुषार घरी येताच सुहानी आणि तिच्या वडिलांनी त्याला घेऊन बोरीवली पोलीस ठाणे गाठले.पुन्हा लागले थाटात लग्नमुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांची शोधाशोध सुरू असतानाच सुहानीने वडिलांना फोन करून नवतुषारसोबत लग्न केल्याचे सांगितले. त्यामुळे तिचे वडील तिच्यावर नाराज होते. मात्र पुढच्या काही दिवसांत सुहानीने त्यांना मनवले. अखेर वडिलांनी १८ मार्च रोजी बोरीवलीतील चिकूवाडीमधील एका हॉलमध्ये सुहानीचे थाटामाटात पुन्हा लग्न लावून दिले. ती कायमची पुण्याला राहायला गेली.पोलिसांसमोर उडवाउडवीची उत्तरेबोरीवली पोलीस ठाण्यातही नवतुषार पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. सुहानीसोबत विवाह केला नसून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो यावर तो ठाम होता. येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाने त्याला पहिल्या विवाहाबद्दल विचारले असता तिच्यासोबत घटस्फोट घेत असल्याचे त्याने सांगितले. महिला पोलिसाने वकिलाच्या नंबरची विचारणा केली असता त्याचा हा बनावसुद्धा उघडा पडला. परंतु, नवतुषारने सुहानीला एकटे बोलण्यासाठी नेत, माझ्याविरोधात तक्रार केलीस तर आपल्या शारीरिक संबंधांची बनविलेली व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर घरी परतण्यासाठी नवतुषारकडून धमकावणे सुरूच राहिल्याने अखेर सुहानीने बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. बोरीवली पोलिसांनी सुहानीची फिर्याद दाखल करून घेत नवतुषारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :फेसबुकगुन्हा