Join us

फेसबुकला पडली सुंदर अक्षराची भुरळ; डॉक्टर होण्याची श्रेयाची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 3:00 AM

मंत्री बच्चू कडू यांच्याकडून कौतुक

मुंबई : वय वर्षे केवळ आठ... इयत्ता तिसरी, मात्र अक्षर म्हणजे इतके सुंदर की कुणालाही त्याची भुरळ पडावी. सध्या सोशल मीडियावर अहमदनगरमधल्या राहुरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या श्रेयाच्या सुंदर हस्ताक्षराचा व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत असून श्रेयाचे हस्ताक्षर पाहून सारेच अचंबित होत आहेत. या अचंबित होणाऱ्यांमध्ये शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही नंबर लागला असून त्यांनी स्वत: तिला फोन करून त्यासाठी तिचे कौतुक तर केलेच, मात्र तिच्या आईवडिलांनी घेतलेल्या मेहनतीचेही कौतुक केले. सोशल मीडियावरील श्रेयाच्या व्हिडीओवर लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्सचा अक्षरश: पाऊस पडत आहे.

जिल्हा परिषद शाळा कडू वस्ती, सात्रळ या शाळेत तिसरीत शिकणाऱ्या श्रेयाने हस्ताक्षरासाठी प्रचंड मेहनत घेतली असल्याचे स्वत: जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या तिच्या वडिलांनी सांगितले. मोबाइल आणि टॅबच्या जमान्यात श्रेयाकडून रोज शाईपेनाने रोज अर्धा तास अक्षराचा सराव त्यांनी करून घेतला. सुरुवातीला केवळ सुबक, वळणदार हस्ताक्षराचा फोटो तिच्या वडिलांनी शेअर केल्यावर कोणालाच त्यावर विश्वास बसला नाही, मात्र त्यांनी त्यानंतर शेअर केलेल्या व्हिडीओनंतर त्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की विदेशातूनही तिच्या हस्ताक्षरावर कौतुकाचा वर्षाव झाला. इतकेच काय अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या काही महाराष्ट्रीयन लोकांनी तिला याहून उत्तम कॅलिओग्राफी पेन किट पाठविण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती श्रेयाचे वडील गोरक्षनाथ सजन यांनी दिली.

चित्रकला, वत्कृत्व अशा गोष्टींची आवड असणाºया श्रेयाने मोठे होऊन डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उद्या हाती संगणक किंवा टॅब आला तरी आपण हस्ताक्षर खराब होऊ देणार नसल्याचे तिने आवर्जून सांगितले. तसेच प्रत्येक शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांवर सुंदर हस्ताक्षरासाठीचे संस्कार आणि मेहनत घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आजच्या काळात विद्यार्थ्यांचे अक्षर हे त्यासाठी परीक्षा, भविष्यातील त्याचे दैनंदिन जीवन यासाठी महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया सजन यांनी दिली.

जयंत काकांकडूनही शुभेच्छा

श्रेयाच्या सुंदर अक्षराचे कौतुक सगळ्याच स्तरांतून होत असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही टिष्ट्वटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेया, तुझे हस्ताक्षर, स्पर्धेतील लिखाण सोशल मीडियावर पाहिले आणि तुझे खूप कौतुक वाटले. तुझे वळणदार आणि सुंदर असे हे हस्ताक्षर जरूर जप. तुझ्या भावी शैक्षणिक कारकिर्दीला माझ्या शुभेच्छा, अशा शब्दांत जयंत काका असे लिहीत शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :जयंत पाटीलबच्चू कडूमुंबईसोशल मीडियामहाराष्ट्र