Join us

फेसबुक पोस्टने ‘त्या’ महिलांना मिळवून दिले रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:06 AM

मुंबई : प्रभादेवी येथील सौरभ मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. त्याच्यावतीने फेसबुकवर केलेल्या ...

मुंबई : प्रभादेवी येथील सौरभ मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण समोर आले आहे. त्याच्यावतीने फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमुळे २०० देहविक्रय करणाऱ्या महिलांना १५ दिवसाचे रेशन मिळाले आहे.

देहविक्रय करणाऱ्या महिलांनी आम्हाला अन्नदानाऐवजी पंधरा दिवसांचं धान्य द्या अशी विनंती सौरभ मित्र मंडळाकडे केली होती आणि मंडळाने नागरिकांना आवाहन करताना त्या महिलांच्या भावना फेसबुकवर व्यक्त केल्या. त्या भावना वाचून समाजातील अनेक महिलांनी मंडळाशी संपर्क साधून आर्थिक मदत केली. आज ग्रँट रोड जवळील फॉकलंड रोड गल्लीत त्याचे वितरण करण्यात आले.

सौरभ मित्र मंडळ आपल्या 'अन्नमित्र' उपक्रमातंर्गत गेले दीड महिने अन्नधान्याचे सत्कार्य करतेय. त्याच सत्कार्यादरम्यान गेल्या महिन्यात 'आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर डे' च्यावेळी मंडळाने अन्नदानासाठी फॉकलंड रोड येथील वेश्यावस्तीची निवड केली होती. त्यानुसार अन्नदानासाठी तिथे पोहोचल्यावर देहविक्रय करणाऱ्या महिलांशी संपर्क साधताच त्यांची भयाण परिस्थिती समोर आली. गेले १५ महिने त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. तेव्हा काही वारांगनांनी मंडळाकडे धान्य देण्याची विनंती केली. त्यावर 'बदनाम गल्लीतील सौरभचे सत्कार्य' म्हणून एक फेसबुक पोस्ट लिहून त्यात धान्याची विनंती लिहिली. मंडळाचे अन्नदानाचे सत्कार्य पाहून अनेक मंडळी अन्नदानासाठी स्वतःहून पुढे येत होतेच, पण ती पोस्ट वाचून अनपेक्षितपणे अनेक महिला पुढे आल्या. एका महिलेने चक्क ५०० किलो तांदूळ रत्नागिरीवरून पाठवले. तर अनेकजणींनी ५, १० हजार रुपयांचे धनादेश पाठवित आमच्या उपक्रमाला बळ दिले. काहींनी थेट मंडळाच्या खात्यातही ऑनलाईन पैसे जमा केले. मदतीचा ओघ इतका जबरदस्त होता की मंडळाला धान्यदानाचा कार्यक्रम राबविण्याची तयारी सुरू करावी लागली.