नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 08:53 PM2020-04-10T20:53:56+5:302020-04-10T20:54:33+5:30
रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली.
मुंबई : राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटसही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली.
कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आज विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यंच्यासह विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. मुंबईमधील वाढ चिंताजनक असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्य शासनामार्फत अधिक प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. कंटेनमेंट सर्वेक्षण कृतीयोजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध बाबींची माहिती यावेळी त्यांनी दिली.
राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किटस्, एन ९५ मास्क यांबाबत केंद्र शासनाकडे मागणी यापूर्वीच नोंदविली असून, हे सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिल्यास त्याचे वितरण राज्यभरात करणे सोईचे होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. देशात, राज्यात ज्या पीपीई किटस् उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे जेणेकरून त्यांना उत्पादन करणे शक्य होईल, अशी मागणी करतानाच रॅपिड चाचणी कधी करायच्या या बाबतीत केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचनांसोबतच त्यासाठी लागणारे किटस् देखील उपलब्ध करून द्यावे, असे टोपे यांनी यावेळी सांगितले.