शिक्षकांची फेसरीडिंग ‘हजेरी’

By admin | Published: April 16, 2016 01:12 AM2016-04-16T01:12:02+5:302016-04-16T01:12:02+5:30

महापालिका शाळांतील काही कामचुकार शिक्षकांनी हजेरी मस्टर धाब्यावर बसवले असून बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी लावून प्रत्यक्ष शिकवण्याच्या कामाला अंगठा दाखवला. त्यामुळे आता

Facilitation of teachers 'attendance' | शिक्षकांची फेसरीडिंग ‘हजेरी’

शिक्षकांची फेसरीडिंग ‘हजेरी’

Next

ठाणे : महापालिका शाळांतील काही कामचुकार शिक्षकांनी हजेरी मस्टर धाब्यावर बसवले असून बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी लावून प्रत्यक्ष शिकवण्याच्या कामाला अंगठा दाखवला. त्यामुळे आता अशा मोजक्याच नाठाळ शिक्षकांना वठणीवर आणण्याकरिता फेसरीडिंग हजेरी सक्तीची केली जाणार आहे. यासंदर्भातील यंत्रखरेदीचा प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवण्यात येणार आहे.
शिक्षकांनी यंत्रासमोर उभे राहून आपण कामावर हजर असल्याची खात्री पटवण्याकरिता चेहरा नोंदवायचा आहे. ही यंत्रे खरेदी करण्याकरिता ४३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेच्या १३१ प्राथमिक आणि १६ माध्यमिक शाळा आहेत. या शाळा ८० इमारतींमध्ये भरत असून बालवाडी ते दहावीपर्यंत सुमारे ३९ हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. त्यांना शिकवण्यासाठी सुमारे १२५० शिक्षक सेवेत आहे. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे, त्यांना योग्य शिक्षण देण्याचे आणि त्यांचा पट वाढवण्याचे काम शिक्षकवर्ग करीत असतो. परंतु, काही शिक्षक हजेरी लावून दुसरीकडे जात असल्याचे उघड झाल्याने हजेरीसाठी फेसरीडिंग यंत्रे बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ही हजेरी वेतनाच्या सॉफटवेअरला जोडली जाणार असून दांडी मारणाऱ्यांचे वेतन कापले जाईल किंवा पळून जाणाऱ्यांचे निघणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ८० शाळा इमारतींत सकाळ आणि दुपारच्या सत्रांत भरणाऱ्या शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी ५ गटशाळांसाठी प्रत्येकी ३ याप्रमाणे १० संच घेतले जाणार आहेत. तर, उर्वरित ७५ प्राथमिक शाळांत १ याप्रमाणे ८० संच बसवले जाणार आहेत. त्याद्वारे नोंदवली जाणारी उपस्थितीच यापुढे ग्राह्य धरली जाणार आहे.

योजनांनाच ठेंगा
पूर्वी शिक्षकांची उपस्थिती हजेरी मस्टरमध्ये नोंदवली जायची. त्याची पाने फाडण्यापासून मस्टर गायब करण्यापर्यंत अनेक गैरप्रकार झाले. बायोमेट्रीक पद्धतीत शिक्षक अंगठा लावून हजेरी नोंदवून पसार व्हायचे. आता चेहरा नोंदवायचा असल्याने फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Facilitation of teachers 'attendance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.