मनोहर कुंभेजकर
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि दरवर्षी विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा परिमंडळ 7 ने गणपती विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. कांदिवली,बोरिवली व दहिसर येथे घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी एकूण 29 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यंदा 17 ठिकाणी जादा कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परिमंडळ 7 मध्ये एकूण 11 ठिकाणी नैसर्गिक विसर्जनाची सुविधा उपलब्ध आहे. परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी लोकमतला ही माहिती दिली.
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यंदा याठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नेहमीपेक्षा कमी प्रमाणात पालिकेची परवानगी घेण्यासाठी पुढे आली आहेत.तर येथील सर्व लोकप्रतिनिधींचे व पोलिसांचे देखिल पालिका प्रशासनाला चांगले सहकार्य मिळत आहे अशी माहिती त्यांनी दिली. परिमंडळ 7 मध्ये कांदिवली,बोरिवली व दहिसर पूर्व व पश्चिम भाग येत असून आर दक्षिण(कांदिवली),आर मध्य(बोरिवली) व आर उत्तर (दहिसर) हे पालिकेचे 3 वॉर्ड मोडतात. या परिमंडळाची सुमारे 18 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. येथील घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी पालिका प्रशासनाने ठिकठिकाणी मूर्तीदान केंदाची सुविधा देखिल उपलब्ध करून दिली आहे. तसेच गणेश मूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे आणि नागरिकांनी विसर्जनाला गर्दी करू नये यासाठी पालिकेचे फिरते वाहन कांदिवली,बोरिवली व दहिसर या भागात फिरणार असून विशेष म्हणजे या वाहनांवरच पालिका प्रशासनाने विसर्जनाची खास सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.
गेल्या वर्षी आर दक्षिण वॉर्ड मध्ये 587 सार्वजनिक व 13713 घरगुती गणपती,तर आर मध्य वॉर्ड मध्ये 761 सार्वजनिक व 12821 घरगुती गणपती तर आर उत्तर वॉर्ड मध्ये 346 सार्वजनिक व 4794 घरगुती गणपती आहेत.परिमंडळ 7 मध्ये एकूण 1694 सार्वजनिक व 31328 घरगुती गणपती होते.तर यंदाआतापर्यंत आर दक्षिण वॉर्ड मध्ये 34, आर मध्य वॉर्ड मध्ये 37 व आर उत्तर वॉर्ड मध्ये 35 अश्या एकूण 106 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पालिकेने परवानगी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.