उच्च शिक्षणातील आव्हानांचा सामना करताना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:09 AM2021-08-17T04:09:17+5:302021-08-17T04:09:17+5:30
प्रश्न - कोरोनानंतर शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत, याकडे कसे पाहता? पारंपरिक शिक्षणपद्धती कुठेतरी मागे पडली आहे. ...
प्रश्न - कोरोनानंतर शिक्षण पद्धतीमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत, याकडे कसे पाहता?
पारंपरिक शिक्षणपद्धती कुठेतरी मागे पडली आहे. महाविद्यालये, विद्यापीठांनी या बदलांचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे. बदलांना अनुसरून विद्यापीठही सज्ज होत आहे.
प्रश्न - अपेक्षित शिक्षण पद्धतीनुसार मुंबई विद्यापीठाने काय पावले टाकली आहेत?
भविष्यातील शिक्षण पद्धती, ज्यामध्ये अध्ययन, अध्यापन, संशोधन, कौशल्यवृद्धी या बाबींकडे पाहताना मुंबई विद्यापीठाने मोठे बदल केले आहेत. विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून नावीन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात होत आहे. विद्यापीठ पातळीवर विविध विषयांना एका छत्राखाली आणण्यासाठी स्कूल संकल्पना राबविली जात आहे. या अंतर्गत स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस, स्कूल ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स अशा विविध स्कूल्सची स्थापना करण्यात येत आहे. त्याचबरोबर, नव्याने आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन केंद्र, सागरी अध्ययन केंद्र, सेंटर फॉर एक्सलेंस इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि स्पोर्ट्स सायन्स या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. बदलत्या शिक्षणपद्धतीनुसार विद्यापीठाने अधिकाधिक अभ्यासक्रमांना कौशल्याची जोड दिली असून, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शिक्षणपद्धतीत होणाऱ्या बदलांना अनुसरून विद्यापीठ पावले टाकत आहे. ‘व्हर्च्युअल सेंटर ऑफ एक्सलेंस इन थेरॉटिकल अँड कम्प्युटेशनल फिजिक्स’ या केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये लवकरच मराठी भाषेमध्ये अभियांत्रिकेचे धडे गिरविले जाणार आहेत. औद्योगिक गरजा लक्षात घेऊन, अभियांत्रिकीच्या शाखांमध्ये उद्योन्मुख नवीन विषयांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. विद्यापीठात पहिल्यांदाच संशोधनात्मक क्षेत्रीय केस स्टडिजचा समावेश करण्यात येत आहे.
प्रश्न - भविष्यातील शिक्षण पद्धतीकडे कसे पाहता?
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.आर.ए. माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा एक सदस्य म्हणून आम्ही त्यावर सखोल काम केले आहे. काही दिवसांतच समितीचा अहवाल सूचना व हरकतीसाठी सर्वांसाठी खुला होणार आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भविष्यकालीन शिक्षण पद्धतीचा संपूर्णतः चेहरामोहराच बदलला जाणार आहे. मातृभाषेतून शिक्षण, ज्ञानाला कौशल्याची जोड आणि निरंतर शिक्षण पद्धतीला प्राधान्य अशा अनेक बाबींचा समावेश पहायला मिळणार आहे. या दिशेने मुंबई विद्यापीठाने पावले उचलली आहेत.
प्रश्न - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल?
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. बहुपर्यायी शिक्षण पद्धती, मिश्र शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य, शिक्षण घेत असताना, पदविका, प्रगत पदविका आणि पदवी असे बहुमुखी पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
प्रश्न - विद्यापीठांची नाळ समाजाशी घट्ट कशी जोडली जाऊ शकते?
विद्यापीठे मुळात ही समाजाभिमुखच असायला हवी. मुंबई विद्यापीठाने नेहमीच समाज बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या काळात विद्यापीठाने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजवंतांसाठी दोन वेळच्या जेवण्याची सोय, राज्यात रक्ताचा तुटवडा भासू लागल्यावर विद्यापीठाने पुढे येऊन १९,१०९ युनिट रक्त रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून गोळा केले. वादळ आणि पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटातही विद्यापीठाने गरजवंताना मदत केली.
प्रश्न - विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल?
येत्या काळात तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण हे अधिक बळकट होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनीही तयारी करावी. नावीन्यता आणि कौशल्यवृद्धीसाठी सर्वांना प्रयत्नशील राहावे लागेल. विद्यार्थ्यांनी जॉब सिकरपेक्षा जॉब क्रिएटर व्हावे.
(मुलाखत : सीमा महांगडे)