कोरोनाच्या उद्रेकामुळे जवळपास ९ महिन्यांपासून मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. पण आता अनलॉकच्या टप्प्यात लोकल सेवा हळूहळू पर्ववत करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबतच काही अटी आणि नियमांचं पालन करुन महिलांच्या प्रवासालाही परवानगी ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली. त्यानंतर आता सर्वसामान्य मुंबईकरासाठी लोकल सेवा केव्हा सुरू होणार याची चर्चा डिसेंबर महिन्यांपासून सुरू झाली होती.
मध्य रेल्वेने प्रजासत्ताक दिनी एक पत्रक जारी केलं. त्यानंतर सोशल मीडियावर २९ जानेवारीपासून मुंबईची लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होत असल्याचा मेसेज व्हायरल होऊ लागला आहे. पण खरंच २९ जानेवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकस सेवा सुरू होतेय का? हे जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा मेसेज काय सांगतो?मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचं सांगणारा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. यात २९ जानेवारीपासून उपनगरीय लोकल सर्वसामन्यांसाठी सुरू होणार असं सांगण्यात येत आहे.
सत्य काय?मध्य रेल्वेकडून प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या लोकलबाबत पत्रक जारी करण्यात आलं असलं तरी त्यात सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरू होत असल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने शुक्रवारपासून लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, मध्य रेल्वेने सध्या सुरू असलेल्या फेऱ्यांमध्ये वाढ करून त्या १५८० वरून १६८५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर पश्चिम रेल्वेने, सध्या सुरू असलेल्या १२०१ फेऱ्यांमध्ये वाढ करून त्या १३०० फेऱ्या करण्यात येणार आहेत. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली आहे.
रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच लोकलने प्रवास करता येईल. याव्यतिरिक्त प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, असं आवाहनही मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.