मुंबई - तस्करीच्या माध्यमातून मुंबईत आणलेल्या सोन्यावर प्रक्रिया करून ते देशातील बाजारपेठेत विकणाऱ्या एका टोळीचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे या सोन्यावर एका कारखान्यात प्रक्रिया केली जात होती. या कारवाई दरम्यान ९ किलो ३१ ग्रॅम सोने, १६ किलो ६६ ग्रॅम चांदी, एक कोटी ९२ लाख रुपयांची रोख रक्कम तसेच एक लाख ९० हजार अमेरिकी डॉलर असा एकूण १० कोटी ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये दोन आफ्रिकी नागरिकांचा समावेश आहे. डीआरआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून तस्करीच्या माध्यमातून जे सोने मुंबईत येत होते त्या सोन्यावर झवेरी बाजारातील या कारखान्यामध्ये प्रक्रिया केली जात होती व येथून ते देशात विविध ठिकाणी विकले जात होते. या कारखान्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मिळाली आणि त्यांनी २२ एप्रिल रोजी या कारखान्यावर छापेमारी केली.
या कारखान्यात या टोळीचा सक्रिय सदस्य देखील आढळून आला. चौकशी दरम्यान त्याने या सोन्याच्या खरेदीदारांची माहिती दिली. एका मोठ्या खरेदीदाराकडे डीआरआयचे अधिकारी पोहोचले पण तोवर तो पळून गेला होता. याच आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्या टोळीतील दोन आफ्रीकी नागरिक जवळच एका हॉटेलमध्ये थांबले होते. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तेथून अटक केली.