अमेरिकेत फडकला तिरंगा
By admin | Published: June 26, 2017 01:42 AM2017-06-26T01:42:40+5:302017-06-26T21:52:47+5:30
गेल्या काही वर्षांपासून भारतात पिकलबील खेळाने चांगलाच जोर पकडला आहे आणि याचा प्रत्यत थेट अमेरिकेत आला. येथे झालेल्या गामा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून भारतात पिकलबॉल खेळाने चांगलाच जोर पकडला आहे आणि याचा प्रत्यत थेट अमेरिकेत आला. येथे झालेल्या गामा पिकलबॉल क्लासिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडताना अभिमानाने तिरंगा फडकावला. दखल घेण्याची बाब म्हणजे हे सर्व खेळाडू मुंबईकर आहेत. केवळ दुहेरी सामने झालेल्या या स्पर्धेच्या ४.५ गटात समित कोरगावकर - सचिन पाठारे यांनी सुवर्ण पटकावले, तर खुल्या गटात रवी शेट्टीला गेराल्ड अल्वारडोसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
युनायटेड स्टेट्स आॅफ अमेरिका पिकलबील असोसिएशनच्या (यूएसएपीए) मान्यतेने पेन्सिलवानिया येथील पीट्सबर्ग येथे झालेल्या या स्पर्धेत खुल्या पुरुष गटाच्या दुहेरीत रवीने गेराल्ड अल्वारडोसह खेळताना छाप पाडली. परंतु, अंतिम सामन्यात त्यांना पॉल आॅलिन - जोश एलेनबोगेन विरुध्द ५-११, ११-६, १४-१६ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पहिला सेट गमावल्यानंतर रवी - गेराल्ड यांनी दुसरा सेट जिंकून दमदार पुनरागमन केले. परंतु, तिसऱ्या सेट दरम्यान ऐनवेळी दुखापत झाल्याचा फटका बसल्याने रवी - गेराल्ड यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
त्याचवेळी, याच दुखापतीचा फटका रवीला ४.५ पुरुष दुहेरी गटाच्या अंतिम सामन्यातही बसला. या गटाचा अंतिम सामना भारतीय खेळाडूंमध्येच रंगल्याने येथे भारताचे एकहाती वर्चस्व राहिले. दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू न शकल्याने रवी - सौमित्र कोरगावकर यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच, समित कोरगावकर - सचिन पाठारे यांना सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजयी भारतीय खेळाडू मुंबईकर असून रवी, समित आणि सचिन नोकरीनिमित्त अमेरिकेत चार वर्षांपुर्वी स्थायिक झाले आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील क्लब एमके येथे पिकलबॉलचे धडे गिरवल्यानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या खेळाडूंना अनेक स्पर्धांचा अनुभव असून सौमित्रने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना पदकाची कमाई केली.