फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा, पण...; सचिन सावंतांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 08:04 AM2021-03-28T08:04:46+5:302021-03-28T08:05:17+5:30
देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली.
मुंबई : सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरुन सत्ताधिकारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue). फडणवीस यांच्या उत्तरानंतर सचिन सावंत यांनी ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलंय.
देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर देणार. त्यांना काही समजते तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. दररोज रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर, सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत, मी त्यांच्यापुढे छोटा आहे. मात्र, माझी विश्वासार्हता ही फडणवीस यांच्यापेक्षा कांकणभर जास्त आहे, असे सावंत यांनी म्हटलंय.
आदरणीय फडणवीस साहेब फार मोठे नेते आहेत. मी त्यांच्यापुढे छोटा आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 27, 2021
मात्र....
माझी विश्वासार्हता ही फडणवीस साहेबांपेक्षा कांकणभर जास्त आहे. 😊
नवाब मलिक यांनीच अहवाल फोडला
महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचे बिंग फुटणार आहे. खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला. मी पहिली दोन पानंच दिली होती. नवाब मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही केली नाही. ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिली व मुंबई पोलीस ज्यांचं नाव स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगलं होतं, त्याला बदनाम करण्याचं काम केलं, आता तेच प्रश्न विचारत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.